‘जग मोठ्या संकटातून जात आहे’; पंतप्रधान मोदींचा कोविड, युद्ध आणि ऊर्जा संकटावर इशारा, भारतासाठी चार महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा
PM Modi Netherlands Visit News In Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (16 मे 2026) नेदरलँड्समधील हेग येथे एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी भारताच्या चार प्रमुख ध्येयांविषयी सांगितले आणि भारत मोठी स्वप्ने पाहत असल्याचे म्हटले. तसेच आज येथील वातावरण असे दर्शवते की, हेग हे भारतीय मैत्रीचे एक जिवंत प्रतीक बनले आहे. हे दाखवून देते की पासपोर्टचे रंग बदलू शकतात, पत्ते बदलू शकतात आणि टाईम झोन बदलू शकतात, परंतु भारतमातेची मुले कुठेही राहत असली तरी, हा स्नेह आणि जीवन साजरे करण्याची भावना आपल्यासोबत नेहमीच राहते. अनेक संस्कृती लुप्त झाल्या आहेत, परंतु भारताची विविध संस्कृती अजूनही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. तत्पूर्वी, टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेग येथील सामुदायिक कार्यक्रमाच्या मंचावर दाखल झाले.
भारतीय समुदायाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची आठवण करून दिली. याच दिवशी (१६ मे) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते, ज्यामुळे त्यांच्या पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झाला. तेव्हापासून लोकांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि त्यातूनच त्यांना बळ मिळते व ते अथकपणे काम करत राहतात.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “आज भारतात दर महिन्याला २० अब्जाहून अधिक UPI व्यवहार होतात. याचा अर्थ, जगभरातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी निम्म्याहून अधिक व्यवहार एकट्या भारतातच होत आहेत. बारा वर्षांपूर्वी देशात ५०० पेक्षा कमी स्टार्टअप्स होते.” आज ही संख्या दोन लाखांहून अधिक झाली आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आधी कोविड आला, मग युद्धे आणि आता ऊर्जेचे संकट आहे. हे दशक जगासाठी आपत्तींचे दशक ठरत आहे. जर परिस्थितीत वेगाने बदल झाला नाही, तर गेल्या अनेक दशकांतील यश वाया जाईल. जगातील मोठी लोकसंख्या पुन्हा एकदा गरिबीत लोटली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पंचदेशीय दौऱ्यावर आहेत. नवी दिल्लीहून संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) दौरा केला. त्यानंतर ते त्यांच्या पंचदेशीय दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नेदरलँड्समध्ये दाखल झाले. पंतप्रधान मोदींचा नेदरलँड्स दौरा डच पंतप्रधान रॉब झायटन यांच्या निमंत्रणावरून आहे. हेगमध्ये आगमन झाल्यावर भारतीय वंशाच्या लोकांनी आणि स्थानिक कलाकारांनी पंतप्रधान मोदींचे हार्दिक स्वागत केले.
पंतप्रधान मोदींनी नेदरलँड्समधील भारतीय समुदायाचे त्यांच्या हार्दिक स्वागताबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, नेदरलँड्समधील भारतीय समुदायाकडून मिळालेले स्वागत उत्कृष्ट होते. ९०,००० हून अधिक अनिवासी भारतीय… नेदरलँड्समध्ये भारतीय आणि भारतीय वंशाचे लोक राहतात. तेथील विविध विद्यापीठांमध्ये अंदाजे ३,५०० भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. पंतप्रधान मोदी १७ मे पर्यंत नेदरलँड्समध्ये राहणार आहेत.






