पुण्यातील विकासकामे आणि वाहतूक कोंडीवर खासदार सुप्रिया सुळे यांची जोरदार टीका (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मस्सजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यामुळे राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. यामुळे वाल्मिक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध देखील समोर आणण्यात आले. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. विरोधी नेत्यांसह सत्ताधारी नेत्यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरुन आता खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली आहे.
अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे हे मागील काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची देखील जोरदार मागणी केली जात आहे. वाल्मिक कराडसोबत संबंध असल्याचा दावा करत धनंजय मुंडे यांचे पालकमंत्रिपद देखील काढून घेण्यात आले. यानंतर आता राजीनाम्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर धनंजय मुंडे हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दिल्ली दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नीती आयोगाच्या एका विधानावर देखील भाष्य केले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “देशामध्ये येणारा पैसे आणि होणारा खर्च यामधील जी तफावत आहे याबाबत मी अनेकदा आवाज उठवला होता. याबाबत आता नीती आयोगाने देखील मत मांडले आहे. राजकोषीय व्यवस्थापन असा कायदा दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी काढला. प्रत्येक राज्यांवर एक अकुंश राहावा म्हणून हा कायदा आणला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र पहिल्या टर्मनंतर ते व्यवस्थित केले नाही,” असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार आता राज्याच्या अर्थिक आणि सामाजिक स्थितीमध्ये घसरण होत आहे. आपण या व्यवस्थापनेमध्ये तीन नंबरवर होतो आणि आता सहा नंबरवर गेलो आहोत. निर्यात करण्यामध्ये आपण गुजरातच्या मागे आहोत. गुंतवणुकीमध्ये सध्या तरी बरी स्थिती आहे. ओडिसा आणि छत्तीसगड हे सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे गेले आहेत. एक नंबरला असलेला महाराष्ट्र अर्थिक स्थितीमध्ये खाली का जातोय ?” असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, “धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच पक्षांकडून केली जात आहे.अगदी अजित पवार यांच्या पक्षातून देखील ही मागणी केली जात आहे. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी करत नाही असा कोणताही पक्ष नाही. नैतिकतेच्या जोरावर राजीनामा मागितला जातो आहे. संविधानाच्या चौकटीमध्ये मागणी केली जात आहे. रोज नवीन पुरावे सादर केले जात आहेत,” असा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “अनिल देशमुख, संजय राऊत, छगन भुजबळ यांना ऐकीव बातम्यांवर एक एक वर्ष तुरुंगात टाकण्यात आलं. इथे तर धनंजय मुंडे विरोधात पुरावे समोर येत आहेत. आम्ही तरी विरोधक होतो. हे तर सत्ताधारी आहेत. आम्ही तर कोणत्याही तपासाला सामोरे जाऊ शकतो. एवढी तंत्रज्ञान प्रगत असताना एक फरार आरोपी मिळत नाही तुम्हाला. असा कुठे फरार आहे तो?” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.