देशभक्तीचा खरा अर्थ कोणी शिकवला? प्रियांका गांधींची ती भावनिक पोस्ट चर्चेत
“मी राजीव गांधी यांच्याकडून देशभक्तीचा खरा अर्थ शिकले आहे. आपल्या देशाशी प्रामाणिक राहणे. देशवासीयांचा आदर करणे, प्रत्येक संघर्षाला न जुमानता तुमची कर्तव्ये पार पाडणे आणि शेवटी तुमच्या देशासाठी हसत मृत्यूला कवटाळणे.”, असा भावनिक संदेश प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिला आहे. आपले वडील केवळ एक राजकारणी नव्हते तर एक खरे देशभक्त होते ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केले, असंही त्यांनी म्हटलं आहे.
PM मोदींचं जिनिव्हात भाषण : ‘वन वर्ल्ड फॉर हेल्थ’ थीमअंतर्गत जगासमोर मांडला भारताचा आरोग्यदृष्टीकोन
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त, संपूर्ण भारतात श्रद्धांजली वाहण्यात आली. देशभरातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीव गांधींना ‘बलिदान दिवस’ म्हणून स्मरण केले आणि त्यांना आदरांजली वाहिली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्यांच्या वडिलांचे स्मरण केले आणि दिल्लीतील वीरभूमीवर श्रद्धांजली वाहिली.
राजीव जी से देश भक्ति का असली मायना समझा- अपने देश के प्रति सत्य का भाव रखना, देश की जनता के प्रति श्रद्धा भाव रखना, अपने कर्तव्य को हर संघर्ष के बावजूद निभाना और मुस्कुराते हुए अपने देश के लिए शहीद हो जाना। 🙏🏼
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 21, 2025
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “तुमच्या आठवणी मला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतात. मी तुमची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करतो आणि मी ती पूर्ण करेन.” असं म्हटलं आहे.
राजकीय मतभेद असूनही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीव गांधींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले, “आज राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहतो, असं त्यांनी म्हटलं आहे.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राजीव गांधी यांचे वर्णन “भारताचे महान सुपुत्र” असं केले आहे. राजीव गांधी यांनी भारताला २१ व्या शतकात नेणाऱ्या दूरदर्शी सुधारणांचा पाया घातल्याचंही त्यांनी सांगितलं. सचिन पायलट म्हणाले की, “राजीव गांधी एक दूरदर्शी नेते होते. त्यांचा प्रगतीशील दृष्टिकोन आणि आधुनिक विचारसरणीने देशाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या धोरणांनी भारताला नव्या उंचीवर नेले.”
राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी झाला. १९८४ मध्ये त्यांच्या आई आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. राजीव गांधींचा कार्यकाळ १९८४ ते १९८९ पर्यंत होता. या काळात त्यांनी भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक आधुनिकीकरणाचा पाया घातला. त्यांनी संगणक, दूरसंचार आणि शिक्षण क्षेत्रात अनेक सुधारणा राबवल्या.१९८८ मध्ये, त्यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज (NASSCOM) ची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे भारताच्या सॉफ्टवेअर उद्योगाला जागतिक मान्यता मिळाली. त्यांच्या कार्यकाळात शाळा आणि विद्यापीठांमध्ये संगणक शिक्षणाचा प्रचार करण्यात आला.
वक्फ कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद; कायद्यातील असंवैधानिक तरतुदींवर सविस्तर आक्षेप
२१ मे १९९१ रोजी, तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान LTTE ने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधींची हत्या करण्यात आली. त्यांच्या निधनाने केवळ काँग्रेस पक्षालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला.राजीव गांधींना आजही आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी सुरू केलेल्या सुधारणा आणि तांत्रिक उपक्रमांनी भारताला २१ व्या शतकात नेले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात श्रद्धांजली अर्पण केल्याने लोकांना पुन्हा एकदा आठवण झाली की खरे राष्ट्रनिर्माते केवळ पदांनी नव्हे तर विचारांनी आणि कृतींनी ओळखले जातात.