हल्ल्यानंतर पुन्हा रेखा गुप्तांविरोधात मुर्दाबादच्या घोषणा
New Delhi News: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर दोन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या हल्ल्यातील हल्लेखोराला पोलिसांनी तात्काळ अटक केली. तर रेखा गुप्ता यांच्यावर प्राथमिक उपचारही करण्यात आले. ही घटना अद्याप ताजी असतानाच दिल्लीत रेखा गुप्तांच्या कार्यक्रमातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात एका व्यक्तीने मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचे समोर आले आहे. या दरम्यान, त्या व्यक्तीचा व्यापाऱ्यांशी वाद झाला. पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीला कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा आणि भाजप आमदार अरविंदर सिंग लवली हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोषणा देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव प्रवीण शर्मा असे आहे. गांधी नगरमधील अजित नगर येथील रहिवासी असलेले ६० वर्षीय प्रवीण शर्मा यांचा टीव्ही केबलचा व्यवसाय आहे. ते गेल्या ४० वर्षांपासून स्वतःला भाजपचा कार्यकर्ता असल्याचेही सांगतात. पण गांधी नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अरविंद सिंग लवली जनतेला संबोधित करत असताना प्रवीण शर्मांनी अचानक मुख्यमंत्री गुप्तांविरूद्ध घोषणाबाजी सुरू केली. आपल आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रवीण शर्मा बॅरिकेड्सच्या मागे अगदी रस्त्यावर होते. तिथूनच त्यांना ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्मंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षेत कोणतीही चूक झाली नसल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
Rain Update : महाराष्ट्र, उत्तराखंडसह अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट; पुढील 24 तासांत
मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्लीतील गांधीनगर येथील घाऊक कपड्यांच्या विक्रेत्यांच्या कार्यक्रमात पोहोचल्या होत्या, जिथे या व्यक्तीने मुर्दाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. जनसुनावणीदरम्यान हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता पहिल्यांदाच एका कार्यक्रमात दिसल्या आणि जनतेमध्ये दिसल्या. या दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. गांधीनगर मार्केट आणि आसपासच्या परिसरात दिल्ली पोलिस आणि सीआरपीएफ जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच, दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथील त्यांच्या निवासस्थानी ‘जनसुनावणी’ दरम्यान राजेश भाई खिमजी भाई साकारिया नावाच्या व्यक्तीने मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला केला. त्यानंतर, सिव्हिल लाईन्समधील सीएम गुप्ता यांच्या अधिकृत निवासस्थानाची सुरक्षा बरीच वाढवण्यात आली आणि सीआरपीएफ जवानांना चोवीस तास तैनात करण्यात आले होते.
रेखा गुप्तांवर हल्ला केलेल्या आरोपी राजेश भाईला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाचा प्रयत्न (कलम १०९), सार्वजनिक कामात सरकारी कर्मचाऱ्यांना अडथळा आणणे (कलम १३२) आणि सार्वजनिक कर्तव्यात अडथळा आणणे (कलम २२१) असे आरोप ठेवण्यात आले आहेत.