नवी दिल्ली – जहांगीरपुरी येथे भरदिवसा एका व्यक्तीला गोळ्या घातल्याची घटना समोर आली आहे. जहांगीरपुरीच्या एच-4 ब्लॉकमध्ये जावेद नावाच्या व्यक्तीला गोळी मारल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीसही आता ऍक्टिव झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून आरोपींची ओळख पटवली असून आता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना शुक्रवारी संध्याकाळी 5.15 च्या सुमारास पीसीआर कॉल आला. फोन करणार्याने माहिती दिली की, जहांगीरपुरीच्या एच-4 ब्लॉकमध्ये जावेद नावाच्या व्यक्तीवर गोळी झाडण्यात आली आहे.
माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमीला बीजेआरएम रुग्णालयात नेले. जेथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना उच्च केंद्रात रेफर केले. 36 वर्षीय जावेदच्या उजव्या डोळ्याजवळ गोळी लागली आहे. जावेद यांनी पोलिसांना माहिती दिली की, दुपारी 4.45 वाजता ते एच-3 ब्लॉकजवळील उद्यानाजवळ असताना तीन अल्पवयीन मुले त्यांच्याजवळ आली. तिन्ही मुले त्यांना ओळखत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जावेदने सांगितले की, एका मुलाने त्यांच्या तोंडावर गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर तिन्ही मुले घटनास्थळावरून पळून गेली. जखमीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्लीच्या जहांगीरपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे.