पाकिस्तानच्या अण्वस्त्र हल्ल्यावरून विचारलेल्या अमेरिकेच्या प्रश्नाला एस. जयशंकर यांचे सडेतोड उत्तर
Jaishankar On Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्णाण झाली होती. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सोशल मीडियावरून युद्धबंदीची घोषणा केली. त्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तानात युद्धबंदी झाली. असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून देशातील विरोधी पक्षाने मात्र केंद्रसरकारला चांगलंच धारेवर धरलं. पण भारत- पाकिस्तानात कोणत्याही पद्धतीने तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नव्हता, असे स्पष्टीकरही केंद्र सरकारकडून देण्यात आले. यावरून मतभेद सुरू असतानाच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यावर भाष्य केलं आहे. जर पाकिस्तान थांबला तरच आम्ही थांबू, नाहीतर त्यांना सडेतोड उत्तर मिळतच राहील, असं आम्ही इतर सर्व देशांना सांगितलं होते.
परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीच्या बैठकीत एस. जयशंकर यांनी सहभाग घेतला.परकीय देशांच्या हस्तक्षेपाबाबत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी बोलताना एस जयशंकर म्हणाले की, भारत-पाकिस्तान तणावाबाबत जेव्हा जेव्हा कोणत्याही परकीय देशाकडून आम्हाला विचारणा झाली. तेव्हा आम्ही फक्त एवढेच म्हटले की जर त्यांनी गोळीबार केला तर आम्ही गोळीबार करू, जर त्यांनी थांबले तरच आम्ही थांबू. याशिवाय, सिंधू पाणी कराराबद्दल जे काही होईल ते देशाच्या हिताचे असेल आणि चांगलेच असेल, असही त्यांनी स्पष्ट केलं.
जयशंकर म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यानंतर, जेव्हा अमेरिकन सचिवांनी सांगितले की पाकिस्तान मोठा हल्ला करू शकतो, तेव्हा आम्ही उत्तर दिले की जर पाकिस्तान मोठा हल्ला करेल तर आम्ही त्यापेक्षा मोठा हल्ला करण्यास तयार आहोत. दोन्ही डीजीएमओंमधील चर्चेमुळे युद्धबंदी झाली आणि त्यात तिसऱ्या कोणत्याही देशाची भूमिका नव्हती.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून झालेल्या गोंधळावर, जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला दिलेल्या माहितीवरील परिस्थिती पुन्हा एकदा स्पष्ट केली. ते म्हणाले की ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्यानंतर, आमच्याकडून फक्त दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आल्याचे पाकिस्तानला कळवण्यात आले होते. तसेच जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही थेट सरकारशी बोला. मीडियासमोर जाऊन ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करू नका कारण त्यामुळे वातावरण बिघडेल, पाकिस्तानला संधी मिळेल आणि ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, असंही एस. जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.