लष्काराच्या वैद्यकीय क्षेत्रात महिलांची ऐतिहासिक भरारी; साधना नायर बनल्या मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी
भारतीय लष्करातील महिलांची वाटचाल दिवसेंदिवस भक्कम होत आहे. अलीकडेच NDA (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी) च्या १४८व्या पासिंग आऊट परेडमध्ये पहिल्या महिला बॅचने यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले आणि देशाला १७ नव्या महिला अधिकारी मिळाल्या. परंतु या ऐतिहासिक प्रगतीच्या मार्गावर एक अत्यंत महत्त्वाचं नाव कायमच अधोरेखित केलं जातं ते म्हणजे लेफ्टिनेंट जनरल साधना सक्सेना नायर. या खंबीर आणि प्रेरणादायी महिलेला भारताच्या पहिल्या महिला मेडिकल सर्व्हिसेसच्या डीजी (आर्मी) होण्याचा मान प्राप्त झाला आहे.दरम्यान लेफ्टिनेंट जनरल साधना सक्सेना नायर नक्की कोण आहेत? त्यांचं शिक्षण आणि लष्करात महत्त्वपूर्ण योगदान, जाणून घेऊया….
दशरथ मांझींची नात लढवणार निवडणूक; राहुल गांधींकडे बोधगयामधून उमेदवारीची मागणी
लेफ्टिनेंट जनरल नायर यांचा जन्म १९६४ साली दिल्ली येथे झाला. त्यांचे वडील एअर कमोडोर विनोद कुमार सक्सेना हे भारतीय हवाई दलात वरिष्ठ अधिकारी होते, तर आई मनोरमा सक्सेना यांनी त्यांचे मार्गदर्शन केले. त्यांचे शिक्षण प्रयागराजमधील सेंट मेरी कॉन्व्हेंट आणि नंतर लखनऊमधील लोरेटो कॉन्व्हेंटमध्ये झाले.पुढे त्यांनी पुणे येथील सशस्त्र बल वैद्यकीय महाविद्यालय (AFMC) येथून डिस्टिंक्शनसह वैद्यकीय पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी फॅमिली मेडिसिनमध्ये पदव्युत्तर शिक्षण, तसेच मातृ व बाल आरोग्य आणि हेल्थ केअर या विषयांत डिप्लोमा घेतला. याशिवाय, AIIMS दिल्ली येथून त्यांनी मेडिकल इन्फॉर्मेटिक्समध्ये दोन वर्षांचं विशेष प्रशिक्षण घेतलं आहे.
त्यांची लष्करी सेवा डिसेंबर १९८५ मध्ये भारतीय लष्कराच्या मेडिकल कोरमध्ये कमीशन घेऊन सुरू झाली. त्यांनी अनेक वर्षे भारतीय हवाई दलाच्या पश्चिमी आणि प्रशिक्षण कमान यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी वैद्यकीय व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सशस्त्र दलांतील जवानांचे आरोग्य सुधारण्यावर विशेष लक्ष दिलं. डीजी मेडिकल सर्व्हिसेस (आर्मी) पदावर नेमणूक होण्यापूर्वी त्या डायरेक्टर जनरल हॉस्पिटल सर्व्हिसेस (सशस्त्र बल) म्हणून कार्यरत होत्या, जिथे त्यांच्या कार्यकाळात आर्म्ड फोर्सेसच्या सर्व शाखांमधील वैद्यकीय सेवा सुधारण्याचे नेतृत्व त्यांनी केलं.
लेफ्टिनेंट जनरल नायर केवळ वैद्यकीय सेवांपुरतीच मर्यादित नाहीत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) च्या मसुदा समितीत त्या तज्ज्ञ सदस्य म्हणून सहभागी होत्या. डॉ. कस्तुरीरंगन समितीने तयार केलेल्या या धोरणात वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा आणि नव्या संकल्पनांचा समावेश करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.सध्या डीजी मेडिकल सर्व्हिस आर्मी या पदावर कार्यरत असलेल्या लेफ्टिनेंट जनरल नायर यांचं मुख्य उद्दिष्ट आहे भारतीय लष्कराच्या जवानांना उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा देणं. त्यांचा दृष्टीकोन आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा समावेश करून सैन्याच्या मानसिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा घडवून आणणं हा आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय लष्करात मानसिक आरोग्यावर अधिक भर दिला जात आहे, जे अत्यंत गरजेचं आणि भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल ठरत आहे.
लेफ्टिनेंट जनरल साधना सक्सेना नायर केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जागतिक लष्करी व्यवस्थेत महिलांच्या नेतृत्त्वाचे प्रेरणास्थान ठरल्या आहेत. त्यांनी पुरुषप्रधान लष्करी व्यवस्थेत स्वतःची जागा केवळ निर्माणच केली नाही, तर त्यात प्रगतीचे नवे मापदंडही प्रस्थापित केले. अशा धाडसी, दूरदर्शी आणि सेवाभावी अधिकारीचा आदर्श उभारून देशभरातील महिला अधिकारी आणि विद्यार्थिनींसाठी त्या एक प्रकाशस्तंभ ठरत आहेत.