दशरथ मांझींची नात लढवणार निवडणूक; राहुल गांधींकडे बोधगयामधून उमेदवारीची मागणी
बिहार विधानसभा निवडणुकांची चाहूल लागत असतानाच देशाचे प्रसिद्ध ‘माउंटन मॅन’ म्हणून ओळख असणारे दशरथ मांझी यांची नात अंशु कुमारी यांनी राजकारणात प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. त्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये बोधगया मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक असून त्यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे तिकीटाची मागणी केली आहे.
राहुल गांधींनी नुकताच बिहारमधील गया जिल्ह्यातील गहलौर गावाला भेट दिली. हेच गाव दशरथ मांझी यांचे मूळ गाव आहे, जिथे त्यांनी आपल्या असामान्य संघर्षातून एकट्याने डोंगर फोडून रस्ता तयार केला होता. राहुल गांधींनी गहलौरमधील मांझी यांच्या स्मारकाला अभिवादन केले आणि त्यानंतर त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांशी संवाद साधला.या भेटीदरम्यान राहुल गांधींनी दशरथ मांझींचा मुलगा भागीरथ मांझी यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना राजगीरच्या दिशेने जाताना स्वतःच्या गाडीत सोबत नेले. या सन्मानाने मांझी कुटुंब भारावून गेले असून त्यांना राहुल गांधींकडून आणि काँग्रेस पक्षाकडून खूप अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
भागीरथ मांझी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “माझ्या मुलीला अंशु कुमारीला राजकारणात येण्याची इच्छा आहे. ती बोधगया मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे. आम्ही राहुल गांधींकडे काँग्रेस तिकिटाची मागणी केली आहे.” कुमारी यांनीही सांगितले की, “दशरथ मांझी यांनी समाजासाठी अपार कष्ट घेतले. आता आम्ही त्यांचा वारसा पुढे नेत, समाजसेवेच्या माध्यमातून लोकांचे जीवन सुधारायचे आहे. जर काँग्रेसने तिकीट दिले तर मी पूर्ण ताकदीने लढेन.”
सध्या बोधगया मतदारसंघातून राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) कुमार सर्बजीत हे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर ही जागा मिळवण्यासाठी आघाडीतील जागावाटपात राजकीय समन्वय साधण्याचे आव्हान आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्यामुळे गहलौर गावात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. दशरथ मांझींच्या संघर्षाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना राजकारणात संधी मिळावी अशी गावकऱ्यांची भावना आहे. आता काँग्रेस पक्ष अंशु कुमारीला तिकीट देऊन त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवतो का हे पाहणे महत्त्वाचं आहे.