नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड (National Herald) प्रकरणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) आज ईडीसमोर चौकशीसाठी (ED Inquiry) हजर राहणार आहेत. हा प्रकार राजकीय सुडाचा असल्याचा आरोप कॉंग्रेसने (Congress) केला आहे. तसेच, सोनिया गांधींना पाठिंबा (Support) दर्शविण्यासाठी देशभरात निदर्शने (Demonstration) करण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीद्वारे मागील महिन्यात पाच दिवस चौकशी झाली होती.
कोरोना संसर्ग आणि त्यानंतरच्या आजारपणामुळे सोनिया गांधी या चौकशीसाठी हजर होऊ शकल्या नव्हत्या. या कारणामुळे त्यांनी चौकशीची वेळ बदलण्याची विनंती ईडीकडे केली होती. त्यापार्श्वभूमीवर आता त्या ईडीसमोर हजर राहणार आहेत. यादरम्यान, सोनिया गांधींना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी कॉंग्रेसचे सर्व खासदार, नेते निदर्शने करणार आहेत.
पक्षाचे माध्यम विभागाचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी या मुद्द्यावर ट्विट करून पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना लक्ष्य केले आहे. मोदी- शहा जोडीकडून कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाविरुद्ध ज्या प्रकारे राजकीय सूड घेतला जात आहे त्याविरुद्ध कॉंग्रेस पक्षातर्फे सोनिया गांधींना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी उद्या देशभरात निदर्शने करण्यात येतील, असे जयराम रमेश यांनी म्हटले.