फोटो - सोशल मीडिया
दिल्ली : देशाचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेमध्ये देशाच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरु असून विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होत आहे. अर्थसंकल्पावरुन विरोधक आक्रमक झाले असून चर्चासत्र सुरु आहे. दरम्यान, लोकसभेमध्ये काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस सादर केली. यावेळी चीन व भारत यांच्यामधील व्यवहार आणि त्यामध्ये झालेले नुकसान याबाबत चर्चा होती. यावर चर्चा सुरु असताना सभागृह अध्यक्ष ओम बिरला यांचा खासदारांवर पारा चढलेला दिसून आला. खासदारांची सभागृहातील वागणूक यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला आहे.
काय म्हणाले ओम बिर्ला?
सभागृहाचं कामकाज चालू असताना अध्यक्ष एका मंत्र्यांवर चिडले. तिवारी यांच्या प्रस्तावावर चर्चा सुरु असताना एक मंत्री खिशात हात टाकून सभागृहात आले. तसेच त्यांच्या टेबलाजवळ जात होते. ते पाहून लोकसभा अध्यक्ष संतापले. ओम बिर्ला यांनी आपली थेट नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “मंत्री जी तुमचे हात खिशातून बाहेर काढा. मी संसदेच्या सर्व सदस्यांना आग्रह करतो की तुम्ही सर्वजण खिशात हात टाकून सभागृहात येऊ नका. ठीक आहे ना? ओम बिर्ला यांनी कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री त्याबाबत प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नांमध्ये होते. यामुळे सभागृह अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिक राग व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या खासदारालाही तंबी
यापुढे ते म्हणाले, तुम्ही मध्ये का बोलताय. तुम्हाला काय विचारायचं आहे ते सांगा, तुम्ही इतरांना खिशात हात टाकून सभागृहात फिरण्याची परवानगी द्याल का? मला हे वागणं योग्य वाटत नाही. सर्व सदस्यांना माझं आणखी एक सांगणं आहे की संसदेचे एखादे सदस्य बोलत असताना दुसऱ्या कोणत्याही सदस्याने बोलणाऱ्या सदस्यासमोर बसू नये. इतर सदस्यांनी त्याच्या मागे जाऊन बसावं, असा आदेश सभागृह अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला. ओम बिर्ला यांनी महाराष्ट्राचे गडचिरोलीचे कॉंग्रेस खासदार नामदेव किरसान यांनी देखील संसदेमध्ये बोलताना एक हात खिशामध्ये ठेवला होता. त्यामुळे ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली. पुढच्या वेळी खिशात हात टाकून भाषण करू नका, अशी तंबी ओम बिर्ला यांनी दिली.