फोटो सौजन्य- सोशल मीडिया
देशातील सर्वात स्वच्छ शहरापैकी एक असणाऱ्या सुरतने पुन्हा एकदा आपला लौकिक वाढवला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘स्वच्छ वायु सर्वेक्षण-2024’ मध्ये सुरतने देशभरातील तब्बवल 131 शहरांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुरत महानगरपालिकेने व्यापक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न आणि सुरतवासीयांच्या सहकार्यामुळे शहराला अव्वल क्रमांक प्राप्त झाला आहे. 2023 मध्ये सुरत शहर 13 व्या स्थानावर होते. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरतमध्ये PM10 ( पार्टिकुलेट मॅटर किंवा कण प्रदूषण) मध्ये 12.71% ची लक्षणीय घट झाली आहे. 2023 साली इंदोर शहराने प्रथम क्रमांक पटकावला होता.
सुरत महानगरपालिकेने केलेले प्रयत्न
सुरत महानगरपालिकतर्फे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले. त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, धूळीचे नियंत्रण, वाहन उत्सर्जनावर नियंत्रण, बांधकाम कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे, औद्योगिक उत्सर्जन कमी करणे, जनजागृती मोहीम राबवणे, शहरामध्ये परिवहन सेवेसाठी तब्बल 580 इलेक्ट्रिक बसचा वापर करणे असे अनेक उपक्रम राबविले गेले. या उपक्रमात लोकसहभागही मोठ्या प्रमाणात असल्याने याचे फलित म्हणून या सर्वेक्षणात सुरतला प्रथम क्रमांक मिळाला.
शहराला मिळणार दीड कोटींचे बक्षीस
सुरतच्या शहराला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून ‘नॅशनल क्लीन एअर सिटी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार येत्या 7 सप्टेंबर रोजी जयपूर येथे आयोजित कार्यक्रमात सुरतचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासोबतच शहराला दीड कोटी रुपयांचे बक्षीसही मिळणार आहे.महापौर दक्षेश मावाणी यांनीही शहरवासीयांचे आभार मानून सुरतला देशातील सर्वात स्वच्छ शहर बनविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सुरत महानगरपालिकेच्या आयुक्त शालिनी अग्रवाल यांनी या यशाबद्दल शहरवासीयांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
स्वच्छ वायु सर्वेक्षण
केंद्र सरकारकडून स्वच्छ वायु सर्वेक्षण हा एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारणे आहे. या सर्वेक्षणामध्ये घनकचरा व्यवस्थापन, वाहनांचे उत्सर्जन, औद्योगिक उत्सर्जन इत्यादी विविध बाबींच्या आधारे शहरांचे मूल्यमापन केले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे या स्पर्धेमुळे देशातील शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.