वायुसेनेच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला; पाच जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात तीन अधिकाऱ्यांसह पाच जवान जखमी झाले. हल्ल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घातला व परिसरात शोधमोहीम सुरू केली.

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात तीन अधिकाऱ्यांसह पाच जवान जखमी झाले. हल्ल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घातला व परिसरात शोधमोहीम सुरू केली.

    शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या जवानांचा ताफा निघाला होता. दोन वाहनांमधून हे जवान जात होते. पुंछ जिल्ह्यातील सूरनकोटमधील सनाई गावाजवळ या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. शाहसीतारजवळील हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आली आहेत, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

    अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारी उच्च माध्यमिक शाळेजवळ संशयित दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार झाला. दहशतवाद्यांनी शाळेजवळील एमईएस व आयएएफ वाहनावर गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. अनंतनाग-राजौरी-पुंछ लोकसभा मतदारसंघात ही घटना घडली आहे, जेथे निवडणूक आयोगाने मतदानाचे वेळापत्रक बदलले आहे. आता 25 मे रोजी येथे मतदान होणार आहे.

    बांदीपोरात दहशतवादी अड्डा उद्ध्वस्त

    जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या एका तळाचा पर्दाफाश केला आणि तेथून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा हस्तगत केला. बांदीपोरा पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, लष्कराच्या 13 आरआर बटालियनचे जवान, बांदीपोरा पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तिसऱ्या बटालियनने केलेल्या संयुक्त मोहिमेदरम्यान उत्तर काश्मीर जिल्ह्यातील चंगळी जंगल अर्गममध्ये दहशतवादी लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त करण्यात आले आहे.