Photo : NARENDRA MODI
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेस कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे देशात भाजपने मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर देशात सरकार स्थापन केले आहे. यावरूनच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी टीका केली आहे. सध्या ‘एनडीए’ची स्थिती नाजूक असून, सरकार कधीही कोसळेल, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्याच मुलाखतीत राहुल गांधींनी संवाद साधला. यामध्ये त्यांनी सांगितले की, ‘4 जूनच्या निर्णयानंतर भारतीय राजकीय परिदृश्यात मोठा बदल झाला आहे. त्यांचं संख्याबळ इतकं कमी आहे की त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. एनडीए सरकार तिसऱ्या कार्यकाळात आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करू शकते. विरोधकांकडून द्वेष, राग पसरवले जावू शकते. त्याचा फायदा घेऊ शकतात, ही कल्पना लोकांनी या निवडणुकीत नाकारली आहे. त्यामुळे एनडीएत संघर्ष होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी वायनाड सोडणार
दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी हे वायनाड आणि रायबरेली या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, आता त्यापैकी एक जागा त्यांना सोडावी लागणार आहे. त्यानुसार, त्यांनी वायनाड ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला असून, या जागेवरून आता त्यांच्या बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या जागेवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.