संग्रहित फोटो
नवी दिल्ली : आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर शेतकरी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी रविवारी शेतकरी संघटनांसोबत होत असलेल्या चर्चेत तोडगा निघणार असल्याची आशा व्यक्त केली आहे. यासोबतच केंद्र सरकार शेतकऱ्यांना एमएसपीसाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देणार असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात सूत्राकडून आली आहे.
रविवारी संघटनांसोबत होत असलेल्या बैठकीत सरकार एमएसपीसह अन्य मुद्यांवर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देणार असून, यासाठी संघटनांनाच त्यांच्या प्रतिनिधींची नावेही मागणार आहे. यापूर्वी शेतकरी नेत्यांसोबत तीनवेळा चर्चा झाल्या आहेत. परंतु, तोडगा निघू शकला नाही. एमएसपीवर शेतकरी ठाम आहेत.
भाजप नेत्याच्या घरासमोर आंदोलन
शेकऱ्यांची संघटना बीकेयूने पंजाब आणि हरयाणातील सीमांवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ पंजाबमधील बर्नाला येथे भाजपा नेते केवलराम ढिल्लो यांच्या घरासमोर निदर्शने केली.
दिल्लीत भाजीपाला महागणार
शेतकऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू असल्याने त्याचा परिणाम दिल्लीत जाणवू लागला आहे. आंदोलनामुळे पुरवठा बाधित झाला असून, पंजाबातून येणाऱ्या भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. आंदोलन आणखी काही दिवस सुरू राहिल्यास अन्य भाजीपालाही महागणार असल्याची चिन्हे आहेत.