मणिपुरात हिंसाचाराची धग कायम; इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद

गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत धगधगत आहे. राज्यात दोन समुदायांमधील हिंसाचाराने उग्र रूप धारण केले असून, या कालावधीत अनेकांना जीव गमवावा लागला.

    इम्फाळ : गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराच्या (Manipur Violence) आगीत धगधगत आहे. राज्यात दोन समुदायांमधील हिंसाचाराने उग्र रूप धारण केले असून, या कालावधीत अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक लोक बेघर झाले आहेत. सोमवारी जिरीबाम जिल्ह्यात एका पोलिस कर्मचाऱ्याने एका 32 वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली.

    हत्येमुळे संतप्त झालेल्या लोकांनी मंगळवारी पोलिस कर्मचारी लोईतम अरुंता सिंग यांच्या घरावर हल्ला करून नुकसान केले. या घटनेनंतर राज्यात पुन्हा हिंसाचार उसळला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण त्याला विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंटरनेटवर 5 दिवसांसाठी बंदी घातली आहे.

    दोन महिन्यांसाठी जमावबंदी

    चुरचंदपूर जिल्ह्यात आयपीसी कलम 144 अन्वये दोन महिन्यांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा दंडाधिकारी धरुनकुमार एस. यांनी दोन गटातील संघर्षामुळे शांतता भंग होण्याची शक्यता असून, परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असल्याचे आदेश जारी केले. या आदेशानंतर सोमवारपासून राज्यात कलम 144 लागू करण्यात आले असून ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू राहणार आहे. या अंतर्गत एकाच ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना उभे राहण्यास किंवा एकत्र येण्यास मनाई आहे आणि शस्त्रे बाळगण्यासही बंदी आहे.