मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता शेवटच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात (Voting Begins) झाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यात भाजपचे देखील उमेदवार असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
राज्यात आज मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पाचव्या टप्प्यातील प्रचारात मुंबईत महाविकास आघाडीकडून प्रामुख्याने उद्धव ठाकरेंनी प्रचाराची धुरा संभाळली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील प्रचाराच्या मैदानात उतरले होते. याशिवाय, महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा धडाका लावण्यात आला होता.
विशेष म्हणजे भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले. राज ठाकरेंनी प्रचारसभा घेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
या जागांवर होणार मतदान
मुंबईतील 6 जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना वि. शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती.