'हा तर भाजपचा एजंट!' हुमायूं कबीर यांच्या ताफ्यावर हल्ला, मुर्शिदाबादमध्ये तणावपूर्ण परिस्थिती
West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मतदानादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मधून बाहेर पडलेले हुमायूं कबीर आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. या दरम्यान हुमायूं कबीर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसेच सुरक्षाकर्मचाऱ्यांसोबतही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुर्शिदाबादमधील नौदा येथे टीएमसी ब्लॉक अध्यक्ष आणि हुमायूं कबीर यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाली. हुमायूं कबीर हे सध्या ‘आम जनता उन्नयन पार्टी’चे उमेदवार असून त्यांनी यापूर्वी टीएमसीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या विरोधात ‘चोर-चोर’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
West Bengal election 2026 : BJP विजयी मार्गावर? ममता दीदींनी सरळ राजकारण केलं असतं तर…राहुल
हुमायूं कबीर यांनी टीएमसीवर वातावरण बिघडवण्याचा आरोप केला आहे. त्यानंतर टीएमसी समर्थकांनी जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. परिस्थिती तणावपूर्ण झाली असली तरी सुरक्षाकर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे मोठी झटापट टळली. दरम्यान, टीएमसी कार्यकर्त्यांनी हुमायूं कबीर यांना भाजपचा एजंट असल्याचा आरोप केला आहे.
रेजिनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले हुमायूं कबीर विविध मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेत होते. मात्र, प्रत्येक ठिकाणी त्यांना टीएमसी समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.
नौदा विधानसभा क्षेत्रात देशी बॉम्बफेक झाल्याची घटना घडली असून काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे समर्थक रस्त्यावर उतरल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. सुरक्षाकर्मचारी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुर्शिदाबाद हा संवेदनशील जिल्हा मानला जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षाबल तैनात करण्यात आले आहेत. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अर्धसैनिक दलांची अतिरिक्त तुकडीही रवाना करण्यात आली आहे.
टीएमसीने हुमायूं कबीर यांना डिसेंबर 2025 मध्ये पक्षातून निलंबित केले होते. त्यांनी मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशीद च्या धर्तीवर नवी मशीद उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. हा प्रस्ताव सांप्रदायिक सौहार्द बिघडवणारा आणि पक्ष शिस्तभंग करणारा असल्याचे सांगत टीएमसीने कारवाई केली. त्यानंतर हुमायूं कबीर यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला.
२०२६ च्या पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान, आसनसोल दक्षिण मतदारसंघातील भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या वाहनावर कथितरित्या दगडफेक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रहमत नगर परिसरात घडली असून, त्यात वाहनाच्या काचा फुटल्या. अग्निमित्रा पॉल यांनी हिरापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.






