कडाक्याच्या उन्हात भाविकांची पाण्यासाठी वणवण
छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. दररोज हजारो भाविक स्थानिक आणि बाहेरील जिल्ह्यांतून दर्शनासाठी शहरात येत असतात. सध्या तापमानाचा पारा ४१ हून अधिक अंशांच्या पार गेला असून, उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण आहेत. अशा स्थितीत मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी थंडगार माठातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे ही किमान गरज आहे. मात्र, वास्तवात चित्र वेगळेच दिसत आहे.
शहराचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या प्राचीन खडकेश्वर महादेव मंदिर परिसरात पाण्याची कायमस्वरूपी आणि सुसज्ज पाणपोई दिसून येत नाही. दर्शनासाठी येणाऱ्या वृद्धांना आणि लहान मुलांना तहानेने व्याकुळ व्हावे लागत आहे. तेथे प्लास्टिक टाकी मात्र दिसून आली. थंडगार पाण्याचे माठ नसलेली स्थिती पुंडलिकनगर भागातील गजानन महाराज मंदिर आणि इतरही काही मोठ्या देवस्थानांची आहे. या मंदिरांमध्ये उत्सवांच्या काळात मोठी गर्दी असते, मात्र खास उन्हाळ्यासाठी लाल कपडा बांधून पारंपरिक माठातील थंडगार पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत प्रशासन आणि मंदिर विश्वस्त उदासीन असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. काही वर्षांपूर्वी मंदिर परिसरात येथे असणाऱ्या पारंपरिक लाल कपडा बांधलेला माठ नामशेष झाल्याचे चित्र आहे.
शहरातील बऱ्याच मंदिरांच्या आवारात पाणी उपलब्ध नसल्याने भाविकांना नाईलाजास्तव बाहेरून ग्लासभर पाण्यासाठी १ते २० रुपये मौजून महागड्या पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत आहेत. विशेषतः गरीब, ग्रामीण भागातील भाविकांसाठी हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. भक्तीच्या ओढीने आम्ही मंदिरात येतो, पण किमान थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय नसावी, हे दुर्दैवी आहे, अशी खंत युक्त भावना सरूबाई बोडके या ज्येष्ठ महिला भाविकाने व्यक्त केली.
अनेक ठिकाणी मंदिरांकडे लाखो रुपयांचा निधी जमा होतो. मात्र, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक आणि भाविक करत आहेत. किमान उन्हाळ्यात माठातील थंडगार पाणी संस्थांनी किंवा मंदिर प्रशासनाने तातडीने मंदिरांच्या प्रवेशद्वारावर किंवा आवारात ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






