नांदेडमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या जबाबदारी बदलल्या असून काहींचे डिमोशन झाले (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News: नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाने जाहीर केलेल्या मराठवाड्यातील जिल्हा प्रभारी नियुक्त्यांमुळे पक्षांतर्गत राजकीय चर्चाना उधाण आले. काही नेत्यांना मोठी जबाबदारी देत त्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असताना, काही प्रभावी नेत्यांच्या नियुक्त्यांकडे मात्र ‘प्रमोशन की डिमोशन ?’ या नजरेतून पाहिले जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये (BJP Politics) सध्या धक्का तंत्राचा प्रयोग सुरू असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत रंगली आहे.
राज्यसभेचे विद्यमान खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे यापूर्वी मणिपूरसारख्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारीपद होते. अशा नेत्याला आता जालना महानगराची जबाबदारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सांभाळलेल्या नेत्याला महानगरापुरते सीमित करण्यामागे पक्ष नेतृत्वाचा नेमका डाव काय? याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांचे संघटनमंत्री म्हणून प्रभावी काम पाहिलेल्या संजय कौडगे यांना हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : विरोधी पक्षांचा असंवैधानिक पवित्रा…! महिला आरक्षणावरुन चव्हाण पिता-पुत्री आक्रमक
भाजपाकडून ‘बक्षीस, संदेश आणि इशारा’ रणनिती
भाजपचे सरचिटणीस संजय केणेकर यांच्याकडे परभणी जिल्ह्याचे दायित्व सोपविण्यात आले आहे. परभणीत स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक गटात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा सुरू असताना, संघटन एकसंघ ठेवण्याची मोठी परीक्षा त्यांच्यासमोर असणार आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांना लातूर महानगराची जबाबदारी देण्यात आली आहे, तर नव्याने राज्यसभेवर निवडून गेलेले रामराव वडकुते यांना जालना ग्रामीणचे प्रभारीपद देण्यात आले. जालना जिल्ह्यासाठी थेट दोन राज्यसभा खासदारांची नियुक्ती केल्याने त्या जिल्ह्याला पक्षाने विशेष प्राधान्य दिल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नांदेड महानगराची सूत्रे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हाती देण्यात आल्याने स्थानिक संघटनेत नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा : लवकर बरे व्हा!’ रुग्णालयात असलेल्या शरद पवारांसाठी पार्थ पवारांचे खास ट्विट
भाजपातील हा प्रमोशन टू डिमोशनचा खेळ
तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर महानगराची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षातील त्यांचे वजन आणखी वाढल्याचे मानले जात आहे. या सर्व नियुक्त्त्यांमधून भाजपने एकाच वेळी बक्षीस, संदेश आणि इशारा अशी तिहेरी रणनीती अवलंबल्याचे चित्र दिसत आहे. काहींना मोठेपण, काहींना मैदानात उतरण्याची संधी, तर काहींना संघटनात पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भाजपातील हा प्रमोशन टू डिमोशन वा खेळ आगामी काळात कोणाचे राजकीय भविष्य उजळवतो आणि कोणाला बाजूला सारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






