दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यानंतर एनडीए सरकार स्थापन करणार असून नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनडीएने सरकार स्थापनेचा दावा केला असून येत्या रविवारी 9 जून रोजी सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. रविवारी सायंकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची तर इतर 18 खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. यंदा नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला सर्वाधिक मंत्रीपदे मिळणार असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काही जणांच्या नावांची चर्चा आहे.
कोण होणार केंद्रीय मंत्री?
केंद्रीय मंत्रिमंडळासाठी महाराष्ट्रामधून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या आहेत. तसेच भाजप सोबत शिंदे गट व अजित पवार गट देखील सामील झाले आहेत. राज्यामध्ये एकूण 4 मंत्रिपदं दिली जाणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रीपदासाठी भाजपकडून राज्यातील चार खासदारांची नावांची जोरदार चर्चा आहे. यामध्ये माजी मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री पीयूष गोयल, नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. नितीन गडकरी यांच्या कामाचा डंका देशभरामध्ये असून रक्षा खडसे यांच्या रुपाने राज्यातील महिला मंत्री मिळण्याची देखील शक्यता आहे. भाजपसोबत आता अजित पवार गट देखील आहे. अजित पवार यांच्याकडे लोकसभेमध्ये फक्त सुनील तटकरे यांच्या रुपाने एकच खासदार आहे. तरी देखील अजित पवार गटाला मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रिपद मिळालं तर अजित पवार गटाकडे प्रफुल्ल पटेल आणि राज्यमंत्रीपद मिळालं तर सुनील तटकरे मंत्री होण्याची शक्यता आहे.
मंत्रिपदाचा निर्णय मेरीटनुसार
महायुतीसोबत यंदा शिवसेना शिंदे गट देखील आहे. त्यामुळे रविवारच्या शपथविधी सोहळ्यामध्ये शिंदे गटातील कोणत्या खासदाराच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार का याकडे शिंदे समर्थकांचे लक्ष लागले आहे. दिल्लीमध्ये पार पडलेल्या शिंदे गटाच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावाची मागणी इतर खासदारांनी केली आहे. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार बनले असल्यामुळे त्यांना मंत्रिपद दिले जावे याबाबत काही खासदार आग्रही आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांची केंद्रातील मंत्रिपदी वर्णी लागण्याची मोठी शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाबाबत वक्तव्य केले. मंत्रिपदाचा निर्णय मेरीटच्या आधारावर होईल, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.