प्रियंका गांधींना PM मोदींवरील टीका भोवणार? केंद्रीय निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

राजस्थानमधील एका प्रचार सभेत बोलताना प्रियांका गांधी-वाड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ही टीका आचार संहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर आयोगाने प्रियांकांना नोटीस बजावली आहे.

    जयपूर : प्रियांका गांधींना पंतप्रधान मोदींवरील टीका भोवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमधील एका प्रचार सभेत बोलताना प्रियांका गांधी-वाड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ही टीका आचार संहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप करत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर आयोगाने प्रियांकांना नोटीस बजावली आहे.

    प्रियंका गांधी यांनी राजस्थानमधील दौसा इथं एका सभेला संबोधित करताना मोदी यांच्यावर टीका केली होती. निवडणूक आयोगाने प्रियंका यांना नोटीस पाठवून ३० ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या नोटीसला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

    काय आहे प्रकरण?

    भाजपने तक्रारीत म्हटलं की, प्रियंका गांधी यांनी २० ऑक्टोबर रोजी औसा येथील सभेला संबोधित करताना म्हटलं की, ‘नरेंद्र मोदी यांनी एका मंदिराला दान केलेल्या लिफाफ्यात फक्त २१ रुपये होते. प्रियंका गांधी यांनी म्हटलं की, त्यांनी हे वृत्त टीव्हीत पाहिलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं की, टीव्हीचा दावा खरा आहे हे माहीत नाही. भाजप लोकांना लिफाफा दाखवते, पण त्यात काही नसतं’.

    भाजपची निवडणूक आयोगात तक्रार

    प्रियंका गांधी यांच्या टिप्पणीनंतर केंद्रीय मंत्री अर्जुनसिंह मेघवाल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अर्जुनसिंह मेघवाल यांनी प्रियंका गांधी यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. या मागणी पत्रात त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक धार्मिक भावनांबाबत खोटे दावे करत भावना दुखावण्याचं काम केल्याचं आरोप केला.

    तत्पूर्वी, केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रियंका गांधी यांना आचारसंहितेतील तरतूदीची आठवण करून दिली. ‘पक्ष आणि उमेदवारांनी खासगी जीवनातील पैलूंवर टीका करणं टाळावं, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.