शेअर बाजारात मोठी आपटी; एकच दिवसात गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान!
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. असे असतानाच आजही शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. आज (ता.१२) मंगळवारी शेअर बाजार उघडताच बाजाराची सुरुवात ही सकाळी वाढीसह सुरु झाली. परंतु दिवसभराच्या व्यवहारात बँकिंग, एफएमसीजी, वाहन आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागांच्या जोरदार विक्रीमुळे बाजार घसरणीसह बंद झाला आहे.
शेअर बाजार घसरणीसह बंद
आज (ता.१२) मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 79000 अंकांच्या खाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 24000 अंकांच्या खाली घसरला आहे. आज शेअर बाजार बंद झाला, त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 821 अंकांच्या घसरणीसह 78,675 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 257 अंकांच्या घसरणीसह 23,883 अंकांवर बंद झाला आहे.
(फोटो सौजन्य – iStock)
हे देखील वाचा – ‘हे’ आहे भारतातील सर्वाधिक नोकऱ्या, पगारवाढ देणारं शहर; वाचा… मुंबईचा क्रमांक कितवा?
गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपयांचे नुकसान
आज शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध शेअर्सचे बाजार भांडवल 436.59 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे. जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 442.54 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 5.95 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, आज (ता.१२) शेअर बाजारात बँकिंग, एफएमसीजी, ऑटो, फार्मा, मेटल्स, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस यांसारख्या क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. केवळ आयटी आणि रिअल इस्टेट समभाग वाढीसह बंद झाले. निफ्टी बँक 718 अंकांनी घसरला आहे. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 600 अंकांच्या घसरणीसह आणि निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 233 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
हे देखील वाचा – नववर्षात खुशखबर मिळणार… सरकार जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवणार!
कोणते शेअर्स घसरले? कोणते वधारले?
आज मुंबई शेअर बाजारात (बीएसई) एकूण 4061 शेअर्सचे व्यवहार झाले. ज्यामध्ये 1234 शेअर्स हे वाढीसह बंद झाले आणि 2731 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 291 शेअरमध्ये अप्पर सर्किट आणि 363 शेअरमध्ये लोअर सर्किट आहे. दरम्यान, सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 4 शेअर्स वाढीसह बंद झाले. तर 26 शेअर्स हे घसरणीसह बंद झाले.
यामध्ये प्रामुख्याने वाढत्या शेअर्समध्ये सन फार्मा 0.28 टक्क्यांच्या वाढीसह, इन्फोसिस 0.06 टक्क्यांच्या वाढीसह, आयसीआयसीआय बँक 0.04 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर याउलट घसरणाऱ्या समभागांमध्ये एनटीपीसी 3.16 टक्क्यांच्या घसरणीसह, एचडीएफसी बँक 2.73 टक्क्यांच्या घसरणीसह, एशियन पेंट्स 2.65 टक्क्यांच्या घसरणीसह, एसबीआय 2.52 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)