फोटो - टीम नवराष्ट्र
रत्नागिरी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जरांगे पाटील यांचे कोल्हापूरामध्ये जंगी स्वागत करण्यात आले असून लाखो मराठा बांधव उपस्थित राहत आहेत. निवडणूकीपूर्वी मराठा आरक्षण पाहिजेच अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. सध्या भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे भाजप नेते आक्रमक झाले असून खासदार नारायण राणे देखील संतापले होते. नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांना चॅलेंज देत आपण मराठवाड्यात येऊन सभा घेणार असल्याचं म्हटलं होतं. या चॅलेंजवर जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देताना खोचक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या त्या खोचक वक्तव्याला आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं आहे. “तू मराठवाड्यात आला तरी काही बघू शकत नाही, कारण मी कपडे घालतो”, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. त्यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले नारायण राणे?
खासदार नारायण राणे व मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरु आहे. त्यांनी जरांगे पाटलांना उत्तर देताना सांगितलं की, मनोज जरांगेने कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो. तुझ्यात बघण्यासारखं काय आहे? आतापर्यंत 400 वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली, छत्रपती झाले का? दाढी वाढवून छत्रपती होत नाही. गुणात्मक व्हायला पाहिजे”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी मनोज जरांगे यांना टोला लगावत प्रत्युत्तर दिलं.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले होते?
“मराठ्यांनी 2024 मध्ये ठरवायचे कुठे बसायचे. माझ्या विरोधात टोळ्या उतरवण्यात आल्या. कोकणातील एक जण सध्या भिताडाकडे बघत आहे, हे अग्या मोहळ कुठे कुठे चावेल. मी कधीच म्हणालो नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. तू मराठवाड्यात आला तरी काही बघू शकत नाही, कारण मी कपडे घालतो”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यावर नारायण राणे यांनी आज प्रत्युत्तर दिलं.