एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार (photo Credit- X)
एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उमेदवार निवड समितीचे सदस्य नासेर सिद्दीकी, शेख अहमद, शारेख नक्षबंदी आणि विकास एडके उपस्थित आदी होते. यावेळी नासेर सिद्दीकी यांनी सांगितले की, राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये एमआयएमचे ८३ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर विविध महानगरपालिकांमध्ये १२५ नगरसेवक विजयी झाले. या निकालांच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांच्यासह इतर पक्षांपेक्षा एमआयएमला अधिक यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही ते म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पॅनलद्वारे उमेदवार उभे करण्यात आले असून अनेक ठिकाणी यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतही चांगले यश मिळेल, असा विश्वास शेख अहमद यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, धाराशिव यासह एकूण १२ जिल्ह्यांमध्ये उमेदवार निवडणूक रिंगणात उत्तरवण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याची माहिती शारेख नक्षबंदी यांनी दिली.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी एमआयएमच्या उमेदवार निवड समितीकडे अर्ज सादर करावेत. ग्रामीण भागात सामाजिक व विकासात्मक काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अर्ज स्वीकृती एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात केली जाणार असल्याची माहिती शारेख नक्षबंदी यांनी दिली.
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अर्जाची छाननी करून आणि संबंधित उमेदवारांशी चर्चा करून उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे सिद्दीकी यांनी स्पष्ट केले, महानगरपालिका निवडणुकांमध्ये एमआयएमने विविध जाती-धर्मातील उमेदवारांना संधी दिली असून, पक्षाचा धर्मनिरपेक्ष चेहरा कृतीतून दाखवून दिला आहे, असे विकास एडके यांनी सांगितले.
Chhatrapati Sambhajinagar : ‘शहराच्या विकासासाठी मतदानाचा हक्क नक्की बजावा’ : इम्तियाज जलील






