देवेंद्र फडणवीसांबद्दल चित्रा वाघांचे ट्वीट (फोटो- सोशल मिडिया)
Devendra Fadnavis: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस झाले आहेत. उद्या महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री भाजपचा होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम झाल्याचे समोर येत आहे,. दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठे यश प्राप्त केले आहे. त्यानंतर विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी फडणवीस यांच्या यशाबद्दल ट्वीट केले आहे.
लोकसभेत महायुतीला आणि खास करून भाजपला मोठा फटका बसला होता. त्यानंतर भाजपने विधानसभेसाठी अत्यंत सूक्ष्म अशा पद्धतीने नियोजन केले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला मोठी मदत केली. त्यामुळे भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीला जनतेने मोठे बहुमत दिले आहे. भाजपने राज्यात एकट्याने 132 जागा जिंकल्या आहेत. भाजपने हि निवडणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढवली होती. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान विधानसभेत भाजपने अभूतपूर्व यश प्रपात केल्यावर चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. ‘महाराष्ट्राचा एकच बॉस’ असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे. ‘देवेंद्र द बॉस’ असे म्हणत चित्रा वाघ यांनी फडणवीसांच्या यशाबद्दल ट्वीट केले आहे.
महाराष्ट्राचा एकच बॉस!@Dev_Fadnavis @cbawankule @byadavbjp @ShelarAshish @BJP4Maharashtra pic.twitter.com/OyFEeKL5AW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 3, 2024
मॉडेल ते महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘चाणक्य’
देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. नागपूर महापालिकेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पहिल्यांदा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी आपले राजकारण सुरू केले. अवघ्या 22 व्या वर्षी ते नगरसेवक झाले. तसेच त्यानंतर ते महापौर झाले. सर्वात तरुण महापौर झाल्याची नोंद म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. त्यानंतर ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधांसाभ मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2024 मधील माहितीनुसार ते सलग 6 वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद देखील सांभाळले. त्यांच्या नेतृत्वात भाजपने 2014 मध्ये राज्यात सरकार स्थापन केले. वयाच्या 44 व्या वर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवार यांच्यानंतर कमी वयात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे ते दुसरे नेते ठरले. तर 2019 मध्ये त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून देखील जबाबदारी सांभाळली. सध्या 2022 पासून त्यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी महत्वाची पदे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बिहार आणि गोवा राज्यात देखील भाजपचे सरकार आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार चालले पाहीजे यासाठी संघ परिवार आग्रही असल्याचे म्हटले जात आहे.