झेडएसआयच्या पुणे केंद्रातील डॉ. अपर्णा सुरेशचंद्र कलावते, लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे माजी वरिष्ठ क्युरेटर डॉ. अल्बर्टो झिली, झेडएसआयच्या कोझिकोड येथील पश्चिम घाट प्रादेशिक केंद्राचे एम. डी. जाफर पालोट आणि केरळचे स्वतंत्र पतंग अभ्यासक बाळकृष्ण वलप्पिल यांनी संयुक्तपणे हा शोध लावला.
संशोधकांनी सांगितले की, ‘अंतरम्’ हा पूर्णपणे नवा वंश असून संस्कृतमधील ‘अंतरम्’ या शब्दाचा अर्थ ‘फरक’ किंवा ‘भिन्नता’ असा आहे. वाघपतंगांच्या आर्क्टीइनी उपकुलात नवीन वंशाचे वर्णन होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. अशा शोधांमुळे पूर्वी अज्ञात असलेल्या उत्क्रांतीच्या शाखांचा उलगडा होतो.
ही प्रजाती केरळमधील इडुक्की जिल्ह्यात आढळून आली आहे. पश्चिम घाटातील विविध भागांत व्यापक पतंग सर्वेक्षण करण्यात आले असतानाही हा पतंग केवळ इडुक्कीमध्येच आढळल्याने तो अत्यंत दुर्मिळ असल्याचे संशोधकांचे मत आहे. त्याच्या अळीची खाद्यवनस्पती आणि जीवनचक्राबाबत अद्याप माहिती उपलब्ध नसल्याने या प्रजातीवर पुढील संशोधनाची आवश्यकता आहे.
जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या पश्चिम घाटातील इडुक्की परिसर सध्या अधिवासाचा ऱ्हास, अनियंत्रित पर्यटन, हवामान बदल आणि भूस्खलनाच्या वाढत्या घटनांमुळे दबावाखाली आहे. अशा परिस्थितीत नव्या प्रजातींचे दस्तऐवजीकरण आणि संवर्धन अधिक महत्त्वाचे ठरत असल्याचे संशोधकांनी नमूद केले.
‘पतंग हे परिसंस्थेतील महत्त्वाचे परागीभवन करणारे जीव असून अनेक पक्षी, वटवाघुळे आणि इतर प्राण्यांसाठी अन्नस्रोत म्हणूनही कार्य करतात. पर्यावरणातील बदलांचे संकेत देणारे जैविक निर्देशक म्हणून त्यांना विशेष महत्त्व आहे. ‘अंतरम् इडुक्की’ चा शोध भारतातील कीटकवैविध्याचा मोठा भाग अद्याप संशोधनाच्या प्रतीक्षेत असल्याचे दर्शवते.’
– डॉ. अपर्णा कलावटे,
वैज्ञानिक ई, भारतीय प्राणी सर्वेक्षण विभाग, पुणे






