फोटो - सोशल मीडिया
जालना – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी जरांगे पाटील यांनी उपोषणाचा हत्यार उगारले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून आपल्या उपोषणाची घोषणा केली. संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावी अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. ते आपल्या मागणीवर ठाम आहे. आरक्षणासाठी त्यांनी सरकारला नवा अल्टीमेटम दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 सप्टेंबरला आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. 29 सप्टेंबर हा नवा अल्टीमेटम त्यांनी सरकारला जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. तसेच आरक्षण दिले नाही तर निवडणूक लढवणार असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबोसीमधून सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. यावरुन आता त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्धार केला आहे. अंतरवली सराटी येथून त्यांनी आपले उपोषण जाहीर केले. यावेळी अंतरवलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज जमा झाला होता. मराठा समाजाने जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला नकार देत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या निर्णायवर ठाम आहेत. येत्या 29 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणावर बसणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला 29 सप्टेंबरपूर्वी निर्णय घ्यावा लागणार आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा करताच मराठा समाजाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, “29 सप्टेंबरपर्यंत सरकार काय निर्णय घेतयं ते बघू, यांना आता आपण बघू, यांना निवडणूकीमध्ये पण पाडू.त्यांचे 113 आमदार आपण निवडून आणू देत नाहीत. पाडू म्हणजे पाडूच. त्याची काळजी तुम्ही करु नका. आरक्षणासाठी एक कुटुंब गेलं तरी चालतं. आपल्या जातीचं कल्याण होईल. लाखो कुटुंब वाचतील. ही आरपारची लढाई लढायची. 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण होणार म्हणजे होणारच, मागे हटायचं नाही. मी महिनाभर महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. सगळ्या तालुक्यांमध्ये मी जाणार आहे. 29 सप्टेंबरला सगळा महाराष्ट्र एक होईल. देवेंद्र फडणवीस याची जिरवायची म्हणजे जिरावयचीच. काय व्हायचं ते होऊ दे,” असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
फडणवीसाला माया आहे का नाही?
पुढे जरांगे पाटील म्हणाले, “हे रस्त्यावरच्या लढाईला घाबरत नाहीत. आता सगळा महाराष्ट्र बसवणार. 29 सप्टेंबर पर्यंत देवेंद्र फडणवीसकडे वेळ आहे. बघू यांना मराठा समाजासाठी माया आहे का नाही? नाही तर 29 सप्टेंबरपासून आपण आरपार लढाई करु. तेव्हा आपण ठरवू काय करायचं ते. मी समाजाला शब्द दिला होता की मी हटणार आहे. मागच्या एक वर्षापासून मी हटलेलो नाही. माझ्या समाजाचं एक वर्ष झालं नुकसान होतयं. माझ्या समाजाची बलिदानं गेली. मराठा आरक्षणासाठी बहिणींचं कुंकू पुसलेलं आहे. कोटीने मराठा समाज रस्त्यावर आहे. मला हे सहन होत नाही. त्याच्यामुळे हे 29 सप्टेंबरचं आमरण उपोषण आरपार होणार आहे,” अशा कडक शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.