(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी सिनेसृष्टीतील मनमिळावू आणि लोकप्रिय अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. शनिवारी दि. 16 ऑगस्ट त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत ज्योती चांदेकर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहे. यावेळी त्यांची मुलगी तेजस्विनी पंडितला अश्रू अनावर झाले. ती आईला शेवटचा निरोप देताना खूप भावुक होताना दिसली आहे.
आईला मुखाग्नी देताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे अश्रू अनावर झाले. या क्षणी मराठी चित्रपटसृष्टील अनेक कलाकार उपस्थित होते. वातावरणात हळहळ होती आणि सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणि चेहऱ्यावर दुःख दिसत होते. तेजस्विनीने आईच्या आठवणींना उजाळा देत इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली. “मनमुराद जगणारी, दिलखुलास हसणारी माझी आई आता नाही…” असं तिने लिहिले. आणि अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतल्याची बातमी तिने शेअर केली. चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी तिच्या या पोस्टवर दुःख व्यक्त केले आणि तिचे सांत्वन केले.
ज्योती चांदेकर यांचा प्रवास खूप मोठा होता. केवळ १२ व्या वर्षापासून अभिनेत्रीने स्वतःच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तब्बल ५ दशकांचा हा प्रवास त्यांनी आनंदाने आणि प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यात पार पाडला. ‘धर्मकन्या’, ‘ढोलकी’, ‘पाऊलवाट’, ‘गुरु’ असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेषतः ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजी हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. तसेच अभिनेत्रीने नाटकातून देखील प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाची भुरळ पडली आहे.
प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
त्यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे सहजता आणि वास्तवता. पडद्यावर त्यांनी साकारलेली आई, आजी, घरातील ज्येष्ठ अशी प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनाला जाणून भिडली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं ममत्व आणि डोळ्यांतील आपुलकी यामुळे त्या पडद्यावर दिसल्या की प्रेक्षकांना त्या आपल्याच घरातील व्यक्तिरेखा वाटत असे. आज ‘पूर्णा आजी’ म्हणजेच जेष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर या जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या प्रत्येक भूमिका आणि त्यांचे प्रेक्षकांवरील प्रेम हे नेहमीच चाहत्यांच्या मनात जिवंत राहणार आहे.