काँगो प्रजासत्ताकमधून श्रीकांत शिंदेंची पाकिस्तानवर टीका (फोटो- ani)
किनशासा: काँगो प्रजासत्ताक अनेक वर्षांपासून संघर्षग्रस्त भागात आहे. त्यांना माहित आहे की दहशतवाद, सीमापार दहशतवाद आणि प्रायोजित दहशतवाद याचा एखाद्या देशावर कसा परिणाम होतो. व्यापार आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत, तसेच व्यापार आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, असे प्रतिपादन भारताच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे प्रमुख शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आफ्रिकेतील काँगो प्रजासत्ताकमध्ये दाखल झाले. आज सोमवारी त्यांनी काँगो प्रजासत्ताकच्या मंत्र्यांशी भेटीगाठी घेऊन ऑपरेशन सिंदूर आणि भारताची दहशतवादविरोधातील भूमिका पटवून दिली.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, आज माझ्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काँगो लोकशाही प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र राज्यमंत्री मा. थेरेस कायिकवांबा वॅगनर यांची भेट घेतली. या बैठकीत भारताने दहशतवादाविरोधात कसा लढा दिला आहे हे मांडले. आम्ही त्यांना देखील दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचा आमचा ठाम संदेश दिला. या बैठकीत भारताच्या दहशतवादाविरोधातील भूमिकेचा पुनरुच्चार केला. दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात काँगो लोकशाही प्रजासत्ताक सरकारने भारताला पूर्ण पाठिंबा दिला.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, जे जागतिक दहशतवाद आणि सीमा पार अतिवाद यांच्याविरुद्ध चालू असलेल्या राजनैतिक संपर्क मोहिमेचा भाग आहे. आफ्रिकेतील महत्त्वाच्या राष्ट्रांबरोबर भारताच्या धोरणात्मक व जनसंपर्क संबंधांना बळकटी देण्यासाठी आणि दहशतवादाविरुद्ध जागतिक सहमती तयार करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ लोकशाही प्रजासत्ताक काँगो (DRC) देशाच्या दौऱ्यावर आहेत.
याआधी युएईमधील सर्व मान्यवर व मंत्र्यांची भेट घेतली. तिथे चांगला प्रतिसाद मिळाला. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचा आमचा संदेश युएईने खूप चांगल्या प्रकारे स्वीकारला आहे. युएईने गेली अनेक वर्षे भारतासोबत उभं राहून साथ दिली आहे आणि ती साथ भविष्यातही कायम राहील, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान
पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असून पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला, अशी घणाघाती टीका संयुक्त अरब अमिरात दौऱ्यावर गेलेले शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी यूएईमधील विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली, यावेळी ते बोलत होते.
Shrikant Shinde : पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची घणाघाती टीका
यावेळी खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, आता संपूर्ण देशासाठी पाकिस्तानचं खरं रूप जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो आहे. जैश-ए-मोहम्मद किंवा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांची कार्यपद्धती एकसारखीच आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशवातवादी संघटनेने घेतली होती. मात्र पाकिस्तानच्या दबावानंतर त्यांनी ट्विट नष्ट केले. दहशतवादाने भारतालाच नाही तर यूएई, युके, अमेरिका अशा देशांना फटका बसला. जगाच्या पाठिवर असा एकही देश नाही ज्याने दहशतवादाचे परिणाम भोगलेले नाही, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.