पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची घणाघाती टीका (फोटो सौजन्य-X)
अबुधाबी : पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असून पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला, अशी घणाघाती टीका संयुक्त अरब अमिरात दौऱ्यावर गेलेले शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी यूएईमधील विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, आता संपूर्ण देशासाठी पाकिस्तानचं खरं रूप जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो आहे. जैश-ए-मोहम्मद किंवा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांची कार्यपद्धती एकसारखीच आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशवातवादी संघटनेने घेतली होती. मात्र पाकिस्तानच्या दबावानंतर त्यांनी ट्विट नष्ट केले. दहशतवादाने भारतालाच नाही तर यूएई, युके, अमेरिका अशा देशांना फटका बसला. जगाच्या पाठिवर असा एकही देश नाही ज्याने दहशतवादाचे परिणाम भोगलेले नाही, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही संपूर्ण जगाला सांगत आहोत की दहशतवादाविरुद्ध एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. यूएई, जपान यांनी भारताच्या या उपक्रमाचे कौतुक केलं आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षांतून आलो आहोत, काही विरोधक आहेत, काही सत्ताधारी पक्षातले आहेत. पण तरीही आम्ही एकत्र आहोत. आम्ही हा संदेश देत आहोत की अशा परिस्थितीत आम्ही दहशतवादाविरुद्ध एकसंघ आहोत, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
अबुधाबीमध्ये बीएपीएस मंदिराला आज भारतीय खासदारांनी भेट दिली. यावेळी खासदार डॉ. शिंदे म्हणाले की बीएपीएस संस्थेच्या प्रयत्नांनी अबुधाबीमध्ये उभारलेलं भवदिव्य मंदिर हे भारतीयांच्या आस्थेचा आणि अस्मितेच प्रतिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांमधून इथं बीएपीएस मंदिरासाठी योगदान दिले. या मंदिरासाठी जमीन मुस्लिम समुदायाने दिली तर मंदिराचे आर्किटेक्ट ख्रिश्चन व्यक्तीने तयार केले. एकूणच अबुधाबीतील वाळवंटातले बीएपीएस मंदिर हे सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.
डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील खासदारांचे शिष्टमंडळ ‘यूएई’नंतर काँगो, लायबेरिया आणि सीएरा लिओन या देशांना भेट देणार आहे. शिष्टमंडळाकडून सीमापार दहशतवादाच्या आव्हानाचा सामना आणि पाकिस्तानच्या पुरस्कृत दहशतवादी धोरणांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलखोल केली जाणार आहे.