अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू करून कोरोनाच्या काळामध्ये गरीब जनतेला धान्य पुरवठा करून कोणालाही उपाशी ठेवले नाही. मी खासदार असेपर्यंत नगर जिल्ह्यात रेशनमध्ये होत असलेला काळाबाजार खपून घेणार नाही. गरिबांच्या रेशनचे धान्य खाणारे व यामध्ये काळा बाजार करणाऱ्यांचे कधी चांगले होत नाही. त्यामुळे रेशन धान्यामध्ये कोणीही काळाबाजार करू नये. महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड मारणारे मांजर आहे, अशी टीका भाजप खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी केली.
केडगाव येथे भारतीय खाद्य निगम अहमदनगर शाखा येथे 75 व्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सुजय विखे बोलत होते. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, भारतीय खाद्य निगचे अधिकारी बी. एम. राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, नगरसेवक स्वप्नील शिंदे, अविनाश दाभाडे, गणेश नन्नवरे, जालिंदर कोतकर, रमाकांत गाडे, बच्चन कोतकर, नगरसेवक योगीराज गाडे, आ.बी. चिंतामणी आदी उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे म्हणाले, प्रशासनाने शासनाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचव्यात. बंगालच्या निवडणुकीत ममता सरकार विजयी झाले की हे फटाकडे फोडतात, कृषी कायदे रद्द झाले की हेच फटाकडे फोडून आनंद उत्सव साजरा करतात. याचं एकमेव कारण म्हणजेच महाविकास आघाडी सरकारचे अपयश झाकण्यासाठी हे दुसऱ्याच्या ताटात तोंड मारणारे मांजरे आहे हीच उपमा यांना शोभते.
तसेच ममता जिंकल्या मोदींचा अहंकार तुटला, कृषी कायदे मागे घेतले मोदींचा अहंकार तुटला, महाविकास आघाडी सरकार यातच आनंद उत्सव साजरा करतात. परंतु, या आघाडी सरकारला राज्यात सुरू असलेल्या परिवहन महामंडळाचे हरताल सोडवता येत नाही. त्यांचे हे दुर्भाग्य आहे, अशी टीका डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.
यावेळी बोलताना पुढे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हे कर्तव्यशून्य असल्यामुळे जनतेला राज्यातील योजनांचा लाभ मिळत नाही. परंतु, नरेंद्र मोदी यांनी मंत्री पियूष गोयल यांच्या खात्यामार्फत गोरगरीब जनतेला धान्य पुरवठाचे काम सुरु केले आहे. ही योजना आता 2022 पर्यंत चालू राहणार आहे. या योजनेचा लाभ खर्या अर्थाने लाभार्थ्यांना होणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात असे ते म्हणाले. यावेळी आर. बी. राऊत यांनी केंद्राच्या सुरू असलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याणकारी योजनेची माहिती दिली.