फोटो सौजन्य- iStock
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेल्या योजनेसाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ६५ वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेकरिता राज्यात तब्बल ६ लाख २५ हजार १३९ जेष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र झाले आहेत. २३ ऑगस्ट पर्यंत राज्यातील २ लाख ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज भरले होते मात्र अवघ्या २०-२५ दिवसांच्या कालावधीतच पुढील ४ लाख ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज देत योजनेला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
विभागानुसार आकडेवारी
राज्यात मुंबई विभागात ६३ हजार ९०, नाशिक विभागात १ लाख १२ हजार ७६१, पुणे विभागात ९१ हजार ६२५, अमरावती विभागात १ लाख ३२ हजार ७५८, नागपूर विभागात १ लाख १० हजार ४५५, छत्रपती संभाजीनगर विभागात ४२ हजार ९७६ लातूर विभागात ७१ हजार ४७४ अर्ज पात्र झाले आहेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदी करणे करिता तसेच त्यांचे मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून 3 हजार रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) व्दारे त्यांना मिळणार आहे. राज्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यावर सरकारकडून रक्कम लवकरच पाठवली जाणार आहे.
योजनेच्या माध्यमातून ही उपकरणे खरेदी करता येतील
पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्ह्यांच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.