जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Jayant Patil Meet Uddhav Thackeray: मुंबई : राज्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे, मुंबईमध्ये राजकीय भेटीगाठी वाढल्या असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईंमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची भेट झाली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांची भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे. उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये झालेल्या या भेटीवरुन चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील महत्वाच्या पालिकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती असणार आहे. या युतीला कॉंग्रेसने आधीच विरोध दर्शवला असून स्वबळाचा नारा दिला आहे. तर शरद पवार गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच संदर्भात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. ठाकरे बंधू राष्ट्रवादी शरद पवार गटाला किती जागा देणार यावर राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये सामील होणार का याचा निर्णय होणार आहे.
हे देखील वाचा : आंबेगावात राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा; शिवसेनेला डावलल्यास बसू शकतो मोठा फटका
जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली आहे. या भेटीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की , “आमची चर्चा सुरु आहे. शिवसेना (ठाकरे गटासोबत) चर्चा करण्यासाठी मी मुद्दाम आलो होतो. पण अजून युतीबाबत आम्ही निष्कर्षापर्यंत पोहचू शकलेलो नाही. आम्ही एकत्र महाविकास आघाडीमध्ये आहोत. आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत म्हणून मुंबईमध्ये शिवसेनेची आणि आमची युती व्हावी असाच आमचा प्रयत्न आहे,” अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी घेतली आहे.
हे देखील वाचा : राज्यात पुन्हात वाजणार घड्याळाची टीकटीक; अजित पवारांची मागणी शरद पवारांना होणार मान्य?
पुढे ते म्हणाले की, “कॉंग्रेस, शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबईमध्ये एकत्र यावी अशी आमची धारणा होती. परंतू ते दोन मोठे पक्ष आहेत. आमच्या पक्षाची त्या दोन पक्षाऐवढी मुंबईमध्ये ताकद नाही. म्हणून आम्ही शिवसेनेसोबत चर्चा करत आहोत. बरीचशी चर्चा ही सकारात्मक झाली आहे. पण अजून आम्ही निष्कार्षापर्यंत पोहोचलेलो नाही, काही ठिकाणी मागच्या वेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आलेले आहे. त्या जागा आम्हाला सुटाव्या असे पक्षाचे म्हणणे आहे आणि त्यासाठी चर्चा सुरु आहेत,” अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली आहे.
पुण्यात राष्ट्रवादी एकत्र?
पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येत आहेत. याबाबत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत याबद्दल विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, ३० तारखेला अर्ज भरण्याचा शेवटाचा दिवस आहे. त्याआधी मी महाराष्ट्रातील सगळ्या शहरात कोण-कोणाशी युती करतंय याची माहिती घेतलेली नाही. त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थानिक नेतृत्व आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत, त्या मताप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या महानगरपालिकांत करतोय,” असे जयंत पाटील म्हणाले आहेत.






