शरद पवार आणि अजित पवार यांच्या युतीने घड्याळ या निवडणूक चिन्हाखाली एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मुंबई,पुण्यासह 29 महापालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील प्रमुख युतींना तडे गेले असून नवीन राजकीय समीकरणे उदयाला येत आहेत. दरम्यान, पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची युती झाली आहे. या युतीमध्ये पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली आहे. तर कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती झाली आहे. त्यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी हे एकटेच पडले. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची युती होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील राष्ट्रवादीमध्ये मोठे नाराजीनाट्य झाल्याचे देखील दिसून आले. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराज होऊन पक्षातून बाहेर पडले. तर प्रशांत जगताप यांनी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे पुण्यातील समीकरणे बदलली आहेत.
हे देखील वाचा : शरद पवार होणार NDA मध्ये सामील? महायुतीच्या नेत्याने केला मोठा दावा
त्याचबरोबर ज्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती भाजप आणि शिवसेनेमध्ये होत नसल्यास राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली जाण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या प्रमुख महापालिकांसाठी अजित पवार आणि शरद पवार हे काका-पुतणे एकत्र येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी अंकुश काकडे आणि आमदार बापू पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये युती सदंर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे, मीडिया रिपोर्टनुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर महानगरपालिका निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढवावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा घड्याळाची टीकटीक वाजण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : आंबेगावात राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा; शिवसेनेला डावलल्यास बसू शकतो मोठा फटका
राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर नाव आणि चिन्हावरुन मोठा वाद निर्माण झाला. शरद पवार गट आणि अजित पवार गटाचा हा वाद अगदी न्यायालयापर्यंत गेला आहे. या परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये शरद पवार पुन्हा एकदा घड्याळ्याच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार होणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अजित पवार यांच्या या आग्रही मागणीमुळे आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट ही मागणी मान्य करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळालं होतं. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं. त्यामुळे आता ही निवडणूक शरद पवार गट घड्याळ या चिन्हावर लढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






