मुंबई : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथे पीडितांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांना आधी त्यांना नजरकैदे नंतर अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ४ ऑक्टोबर १९७७ ला त्यावेळेसच्या जनता पार्टीने इंदिरा गांधींना अटक केली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती होत आहे. प्रियंका गांधी यांना अटक करून भाजपने ही पुनरावृत्ती केली आहे. त्यावेळेच्या जनता पार्टीची जी अवस्था झाली होती, आता तीच अवस्था भाजपची होणार आहे. प्रियंका गांधी यांना भाजपने सन्मानाने सोडले नाही तर आम्ही उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करणार आहोत, असे पटोले म्हणाले.
ते म्हणाले की, देशात पुन्हा एकदा हुकूमशाही पाहायला मिळत आहे. मात्र, लोकच त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत. सध्या भ्रष्टाचाराचे आरोप असणारे मंत्री सत्तेत पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारच्या काळ्या कायद्या विरोधात देश पेटलेला पहायला मिळत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला जाणार होते. त्यांनाही विमानतळावरून माघारी परतावे लागले. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार गांधी कुटुंबाला घाबरलेले दिसत आहे, असेही ते म्हणाले.
राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केले. आतापर्यंत जो कल आपण पाहतोय ते पाहता भाजप मागे पडला आहे. अजून निकाल यायला वेळ आहे. पण काँग्रेस बऱ्याच जागेवर आघाडीवर आहे, असा दावा त्यांनी केला.






