संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागात हानिकारक मांजा (Nylon Manja) विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार, मनपाच्या पथकाने 2060 मीटर लांबीचा हानीकारक मांजा जप्त केला. याप्रकरणी मांजा विक्रेत्यांना पथकाने सात हजार रुपयांचा दंड लावत कारवाई केल्याचे समोर आले. न्यायालयाने हानिकारक नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. तरीही शहरात बऱ्याच ठिकाणी राजरोसपणे मांजा विक्री करण्यात येत आहे.
नायलॉनचा मांज्या विक्री करण्याला बंदी घालण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार व उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतत्वाखाली पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागात एकूण ७३ मांजा व पतंग विक्री दुकानांची तपासणी केली. त्यात सात दुकानांवर कारवाई करण्यात आली. यात २०६० मीटर हानिकारक मांजा आढळून आल्यामुळे सबंधित विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन मांजा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ऑनलाईन पद्धतीने मांजा विक्री होत आहे. नागरी मित्र पथकाने अंदाजे ७ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच जप्त केलेल्या मांजाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यानंतर या ठिकाणी पुन्हा हानिकारक मांजा आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे असे मनपा प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.