बारामती : बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यांच्या औद्योगिक विकासासाठी माझा प्लॅन तयार असून, या भागात मोठ्या प्रमाणात उद्योग आणणार असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील मदत घेणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शरद पवार यांनी बोलताना सांगितले.
व्यापारी मेळाव्यात शरद पवारांचे संबोधन
लोकसभा निवडणुक निकालानंतर बारामती शहारातील महावीर भवन याठिकाणी आयोजित व्यापारी मेळाव्यात पवार पवार बोलत होते. यावेळी विठ्ठलशेठ मणियार, मदन बाफना, सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, युवा नेते युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष संदीप गुजर, तालुकाध्यक्ष ॲड. एस .एन. जगताप, पौर्णिमा तावरे, सुशीलकुमार सोमानी, सुधीर पाटसकर, सुनील सस्ते, शहर युवकअध्यक्ष सत्यव्रत काळे, नरेंद्र गुजराती, संभाजी किरवे, निलेश भिंगे, महावीर शहा, जगदीश पंजाबी, वनिता बनकर तसेच बारामती शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्यामध्ये एमआयडीसी आली
यावेळी पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पुण्यामध्ये एमआयडीसी आली. त्यानंतर मी जेजुरी, बारामतीसह इंदापूर, भिगवण ,चाकण, शिरवळ येथे एमआयडीसीचे जाळे पसरले. त्यानंतर हे तालुके व्यापाराचे केंद्र बनले.
कारखानदारीमुळे व्यापार व्यवसाय वाढला. औद्योगिकीकरणामुळे या भागातील संपूर्ण चित्र बदलून अनेकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला. याठिकाणी व्यवसायाची नवीन केंद्र उभा राहिली आहेत. येणाऱ्या काळात देखील उद्योग उभारणी होणार आहे.
नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली; मात्र ते मी विचारात घेत नाही. बारामती परिसराची औद्योगिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारची मदत घ्यावी लागेल त्यामुळे बारामतीकरांची संपत्तीक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्यासाठी एका विचाराने राहून अर्थकरण कसे मजबूत होईल याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
हिंजवडी या ठिकाणी आयटी पार्क उभा केल्याने अकरा हजार कोटींच्या त्या प्रकल्पातून तीन लाख लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला आहे. आपल्या भागाचा आणखी कायापालट करण्यासाठी बारामतीकरांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. आभार निलेश निंबळककर यांनी मानले.
मोदींना जमिनीवर आणले
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये १० वर्षे सत्तेत राहिलेल्यांना जनतेने जमिनीवर आणले असल्याची टीका करत शरद पवार म्हणाले, निवडणुका येतात जातात, देशाला स्थिरतेची आवश्यकता आहे. मजबूत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.