लोणावळा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) काशी येथे छत्रपती शिवरायांचा जयघोष करतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाला येतात आणि त्यांच्याच पक्षाचा कर्नाटकातील मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांचा द्वेष करतोय. त्याबद्दल भाजप काहीही बोलायला तयार नाही. तुमच्या मनात खरोखर शिवरायांविषयी प्रेम असेल तर आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशा शब्दांत शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवाजी महाराजांचा द्वेष करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र पाय ठेवू देणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कर्नाटकातील बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात विविध ठिकाणी उमटत असून शिवप्रेमींकडून कर्नाटक सरकारसह कानडी समाजकंटकांचा निषेध केला जात आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा शहरात शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली निषेध सभा घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी शिवपुतळा विटंबनेच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
तसेच शिवाजी चौकातील शिवपुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी कनार्टक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, महिला आघाडी संपर्क प्रमुख शादान चौधरी, शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, नगरसेवक शिवदास पिल्ले, सिंधू परदेशी, समन्वयक जयवंत दळवी, युवा सेना तालुका अधिकारी श्याम सुतार, उपशहरप्रमुख मनिष पवार, पुणे विद्यापीठ युवासेना उपाध्यक्ष विशाल हुलावळे, हेमंत मेने, मंगेश येवले, नागेश दाभाडे, ओंकार फाटक आदी उपस्थित होते.