वॉशिंग्टन – अमेरिकी काँग्रेसवर (America Congress) अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाचे (Democratic Party) नियंत्रण राहणार की माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या रिपब्लिकनचे (Republican Party), यासाठी आज मध्यावधी निवडणूक (Mid Term Elections) होत आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागा, सिनेटच्या ३५ जागा आणि ३६ राज्यांच्या गव्हर्नरपदासाठी निवडणुका होणार आहेत.
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर म्हणजे अध्यक्षीय निवडणुकीनंतर दोन वर्षांनी मध्यावधी होतात. ८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) सर्व ४३५ जागांसाठी निवडणूक होईल. ३५ सेनेटर्सही निवडले जातील. मध्यावधी निवडणुकीतून अध्यक्षांच्या दोन वर्षांतील कामगिरीवर मतपत्रिकेतून अंशत: सार्वमत व्यक्त होत असते.
अमेरिकेत ढासळती अर्थव्यवस्था, गर्भपाताचा हक्क आणि लोकशाहीच्या भवितव्याबाबत व्यापक चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमेरिकी संसदेची आगामी रचना कशी असेल, हे या निवडणुकीद्वारे निश्चित होईल. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी प्रचार मोहिमेत मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी रिपब्लिकन पक्षावर, निवडणुकीस नकार देणाऱ्यांनी मतपत्रिकांमध्ये गोंधळ घातल्याचा आरोप केला, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी, वाढत्या डाव्या विचारसरणीला विरोध करण्याचे आवाहन मतदारांना केले होते.
याँकर्स येथील सारा लॉरेन्स महाविद्यालयामध्ये रविवारी संध्याकाळी बायडेन यांनी पाच राज्यांतील चार दिवसांच्या प्रचार मोहिमेची सांगता केली. सभेत त्यांनी डेमोक्रॅटिक गव्हर्नर कॅथी हॉचूल यांचा जोरदार प्रचार केला. त्यांचा सामना रिपब्लिकनच्या ली झेल्डिन यांच्याशी आहे. निवडणूक नाकारणाऱ्यांसाठी कोणत्याही निवडणुकीचे दोनच निकाल असतात- एक तर ते जिंकतात किंवा त्यांची फसवणूक केली गेलेली असते, अशी टीका बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर केली.