पुरूषांमधील वंध्यत्व कमी करण्यासाठी पदार्थ
पुरुष वंध्यत्व हे सहसा वीर्य कमी झाल्यामुळे होते. पुरुषांमध्येही जननक्षमतेची चिंता वाढत आहे. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता प्रभावित होत आहे. सध्या ही समस्या वाढताना दिसून येत आहे. वेळीअवेळी खाणं, कामाचा ताण आणि अनेक बदल यामुळे ही समस्या केवळ महिलांमध्येच नाही तर पुरूषांमध्येही वाढत आहे. पण काही खास पदार्थांच्या मदतीने तुम्ही तुमची प्रजनन क्षमता वाढवू शकता. जाणून घेऊया त्या खाद्यपदार्थांबद्दल.
आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी काही विशेष पदार्थ सांगितले आहेत, जे नेहमीच्या आहारात समाविष्ट केल्यानंतर पुरूषांना त्यांचे स्पर्म काऊंट वाढविण्यात मदत करतील आणि यामुळे वंध्यत्वाची समस्याही निघून जाण्यास मदत मिळेल. (फोटो सौजन्य – iStock)
ऑयस्टर वा सीप
सीप खाऊन वाढवा स्पर्म काऊंट
ऑयस्टरमध्ये भरपूर झिंक असते, जे शुक्राणूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. तसंच यामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिडदेखील भरपूर प्रमाणात असते, जे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतात. कोणत्याही पुरूषाला स्पर्म काऊंट कमी वाटत असेल तर त्यांनी या पदार्थाचा आहारात समावेश करून घ्यावा.
हेदेखील वाचा – पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा
अक्रोड
अक्रोडचा करा आहारात समावेश
अक्रोड बऱ्याच जणांना बदाम वा बेदाण्यांसारखे खायला आवडत नाही. मात्र अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट आणि अल्फा-लिनोलेनिक ॲसिड असते, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. त्यामुळे पुरूषांनी दिवसातून १-२ अक्रोड खाल्ल्यास त्याचा फायदा मिळू शकतो.
टोमॅटो
टॉमेटोने वाढेल शुक्राणूंची संख्या
टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते. नियमित भाज्यांमध्ये टॉमेटोचा वापर अधिक करावा अथवा सलाड स्वरूपात नियमित टॉमेटो खाल्ल्यास पुरूषांना याचा फायदा मिळू शकतो.
ब्रोकोली
ब्रोकोलीचा करा वापर
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे शुक्राणूंची गुणवत्ता वाढवण्यास मदत करते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात. ब्रोकोली ही भाजी शिजवून खाल्ल्यास त्याची चवही चांगली लागते अथवा सलाडमध्ये त्याचा उपयोग करून खावे.
ग्रीक योगर्ट
ग्रीक योगर्टचा करा समावेश
ग्रीक योगर्टमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते, जे शुक्राणूंच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक असतात. तुम्ही आपल्या आहारात अथवा नाश्त्यामध्ये ग्रीक योगर्टचा समावेश करून घेऊ शकता.
हे लक्षात ठेवा
या खाद्यपदार्थांबरोबरच आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणेही गरजेचे आहे. धुम्रपान, मद्यपान आणि तणावापासून दूर राहा. नियमित व्यायाम करा. आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल करा आणि दुपारचे वा रात्रीचे जेवण वेळेवर जेवण्याचा प्रयत्न करा. तसंच दिवसभरात ८ तास व्यवस्थित झोप घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.