(फोटो सौजन्य: istock)
भारतात मागील काही काळापासून मधुमेहाचं प्रमाण फार वेगाने वाढत चाललं आहे. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे ज्यात रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू लागते कारण स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही. भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून अशा आजारात रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवणे फार कठीण होऊन बसते. रक्तातील साखर कमी करण्यासाठी अनेक लोक बऱ्याच वेगवेगळ्या औषधांचे सेवन करतात पण आज आम्ही तुम्हाला काही अशा भाज्यांची माहिती सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने नैसर्गिकरित्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करता येते. रक्तातील साखर कमी करण्यासाठी तज्ञांनी साखरेच्या रुग्णांना कमी जीआय असलेल्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला आहे, म्हणजेच त्या गोष्टी खाल्ल्याने रक्तातील साखर जास्त वाढत नाही. आज आपण मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या भाज्या खाव्यात याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात, यांचे नियमित सेवन आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकते. यांमध्ये अ, क, के, फोलेट, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे अनेक पोषक घटक आढळून येतात. याशिवाय यात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स देखील फार कमी असतात. यामुळेच हिरव्या भाज्यांचे सेवन मधुमेहाच्या रुग्नांसाठी फायदेशीर ठरते. पालक, कोलार्ड्स, बथुआ, सलगमची पाने, मेथीची पाने, राजगिरा पाने आणि केल यांसारख्या भाज्यांचा आपल्या आहारात जास्तीत जास्त समावेश करण्याचा प्रयत्न करा.
मशरूम
२०२० मध्ये द जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजी अँड मेटाबोलिझममध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, टाइप २ मधुमेहासाठी सामान्यतः लिहून दिले जाणारे मेटफॉर्मिन व्हिटॅमिन बी६ ची कमतरता निर्माण करू शकते. मशरूम हे व्हिटॅमिन बी६ चे स्रोत आहेत. त्याचे सेवन या पोषक तत्वाची कमतरता दूर करण्यास मदत करू शकते. तुम्ही याची भाजी बनवून किंवा याचा सूप बनवून आपल्या आहारात मशरूमचा समावेश करू शकता.
कोबी
रोजच्या आहारात खाल्ली जाणारी कोबी मधुमेह रुग्णांसाठी फायद्याची ठरू शकते. कोबीचे सेवन आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.
न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या २०२१ च्या अभ्यासानुसार, कोबीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनासाठी आवश्यक असते. कोबीचे सेवन शरीरातील पचनक्रियेला मंदावते, ज्यामुळे शरीरात साखरेची वाढ होत नाही आणि ती टाळता येते.
गाजर
अनेक पोषक तत्वांनी समृद्ध गाजर आपल्या आरोग्यासाठी आणखीन एक उत्तम भाजी आहे. यात भरपूर प्रमाणात फायबर असते जे पोट भरलेले ठेवते. याशिवाय गाजरमध्ये व्हिटॅमिन ए देखील भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी आवश्यक आहे. त्याचे सेवन रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये असलेले फायबर प्रीबायोटिक म्हणून काम करते. याच्या सेवनाने पोट अधिक काळ भरलेले राहते. याशिवाय यात असलेले पोषक घटक आपल्या शरीराची पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करतात. या भाजीच्या सेवनाने ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तुम्ही ब्रोकोलीची भाजी बनवून किंवा याला याचा सूप बनवून आहारात समावेश करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.