त्वचेच्या समस्या वाढल्या, काय आहेत कारणं (फोटो सौजन्य - iStock)
वाढता ताणतणाव हा केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम करत नाही; तर तो थेट एखाद्याच्या त्वचेवर परिणाम करतो ज्यामुळे त्वचेची जळजळ, त्वचेवरील तेलग्रंथीचे असंतुलन आणि त्वचा निस्तेज होते. शहरातील ५०% कर्मचाऱ्यांना वाटते की त्यांची त्वचा निस्तेज, काळपट झाली असून मुरुमं आणि एक्झिमा होण्याची शक्यता वाढली आहे. जीवनशैलीशी संबंधित त्वचेच्या समस्यांसाठी उपचार घेणाऱ्या २५-४५ वयोगटातील कॅार्पोरेट कर्मचाऱ्यांची संख्या वाढत चालली असून, वेळीच त्वचेची काळजी घेण्याचे आवाहन त्वचाविकार तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
काय आहेत कारणं
सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचे वाढते तास, ताणतणाव हा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मनावरच नाही तर त्वचेवर देखील परिणाम करतो. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे, त्वचेचा निस्तेजपणा आणि मुरुमाची समस्या वाढते, प्रदूषणामुळे त्वचेचे नुकसान होऊन अकाली वृद्धत्व येते, कामाचा वाढता ताण हा हार्मोनल बदलांना कारणीभूत ठरतो ज्यामुळे मुरुमाची समस्या वाढते, वाढत्या स्क्रीन टाइममुळे त्वचेचा कोरडेपणा आणि मेलॅनिनचे प्रमाण वाढते.
Skin Problems ना म्हणा बायबाय! रोज प्या 5 हेल्दी घरगुती ज्युस, पहा जादुई परिणाम
काय सांगतात तज्ज्ञ?
मुंबईतील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे म्हणाल्या की, २५-४५ वयोगटातील ५०% कर्मचारी कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्वचेच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. १० पैकी ५ रुग्ण त्वचेचा निस्तेजपणा, काळपटपणा आणि मुरुमांच्या तक्रारी करतात ज्याचा संबंध जास्त कामाचे वाढते तास, अनियमित झोपेचे वेळापत्रक आणि कामाशी संबंधित ताण आहे. दीर्घकालीन तणावाने कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स जास्त प्रमाणात सोडले जातात, ज्यामुळे त्वचेवरील तेल ग्रंथीचे उत्पादन वाढते. यामुळे त्वचा अधिक संवेदनशीलहोते. ताणतणावाचे व्यवस्थापन करून आणि नियमित स्किनकेअर दिनचर्या स्वीकारून या समस्या वेळाच रोखता येतात.
कसे टाळता येईल?
तणावामुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी एक त्वचा निगा राखण्यासाठी एक विशेष दिनचर्येचे पालन करा, ज्यामध्ये दररोज स्वच्छता राखणे, त्वचेला मॉइश्चरायझ करणे आणि सनस्क्रीन वापरणे, किमान ७ ते ८ तास झोपणे, प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानाशी लढण्यासाठी व्हिटॅमिन सी सारख्या अँटीऑक्सिडंट-समृद्ध सीरमचा वापर करणे, त्वचा हायड्रेटेड राखणे आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी स्क्रीन टाईम कमी करणे, चालणे, मेडिटेशन करणे किंवा दिर्घ श्वास घेणे यासारख्या तणाव व्यवस्थापनाचा सराव करणे, ब्रेकआउट्स कमी करण्यासाठी उशीचे कव्हर, फोन आणि कामाची जागा स्वच्छ ठेवणे समाविष्ट आहे.
मुंबईच्या कॉर्पोरेट वातावरणात कामाचा ताण वाढत असल्याने, त्यामुळे होणारे त्वचेचे नुकसान अधिक सामान्यपणे आढळून येते. जीवनशैलीतील साधे बदल करुन चांगली झोप व तणावाचे व्यवस्थापन करत तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्वचेची निगा राखल्यास त्वचेचे नुकसान टाळता येते असेही डॉ. शरीफा यांनी स्पष्ट केले.
त्वचा समस्येने त्रस्त
एम्स रूग्णालयातील त्वचारोग तज्ज्ञ वैभव कळंबे म्हणाले, २५ ते ४५ वयोगटातील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये त्वचेच्या समस्या निर्माण होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ताणतणाव. अशा स्थिती सध्या अनेक लोक त्वचेच्या समस्येने त्रस्त आहेत. बऱ्याच लोकांना त्वचेचा निस्तेजपणा, वारंवार मुरुमे येणे, खाज सुटणे आणि एक्झिमासारख्या समस्या सतावत आहेत. तसेच कामाचे वाढते तास आणि कमी झोप यामुळे त्वचेचे नैसर्गिक दुरुस्तीचे चक्र बिघडते. नियमित झोप, पुरेसे हायड्रेशन, सनस्क्रीनचा वापर आणि योग्य स्किनकेअर दिनचर्या यासारख्या सोप्या पध्दतींचा अवलंब करुन त्वचेचे संरक्षण करता येते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्किनकेअर उत्पादनांचा वापर केल्यास नक्कीच फायदा होईल.






