(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नात्यांच्या गुंतागुंतीकडे हळुवार नजरेने पाहणाऱ्या आणि माणसाच्या अंतर्मनातील सूक्ष्म हालचाली टिपणाऱ्या कथा ही दिग्दर्शक आदित्य इंगळे यांच्या चित्रपटांची खास ओळख आहे. ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ यांसारख्या चित्रपटांतून नात्यांवर संवेदनशील भाष्य करणारे आदित्य इंगळे आता त्यांच्या नव्या चित्रपट ‘माया’ मधून त्याच भावविश्वाचा पुढचा टप्पा उलगडताना दिसत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढत आहे.
‘माया’च्या टीझरमधून एक महत्त्वाचा विचार ठळकपणे समोर येतो, तो म्हणजे माणूस खरं तर एकटेपणाला घाबरत नाही, तर पोरकेपणाच्या भावनेला घाबरतो. नात्यांमध्ये अडकलेलं मन, त्यातून निर्माण होणारे मनोव्यापार आणि आयुष्य प्रवाही होण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता या संकल्पनांना हा टीझर अतिशय हळुवारपणे स्पर्श करतो. नात्यांच्या गुंत्यात अडकलेली माणसं आणि त्या गुंत्यातून स्वतःला शोधण्याचा प्रवास या चित्रपटातून मांडला जाणार असल्याचं स्पष्ट होतं.
चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर यांनी साकारलेली हाऊस फादरची भूमिका नात्यांकडे पाहण्याचा समजूतदार आणि वेगळा दृष्टिकोन देते. मुक्ता बर्वे, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळा अनुभव देतात. तसेच या चित्रपटामध्ये गिरीश ओक यांची व्यक्तिरेखा विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. आजाराने ग्रस्त, अंतर्मुख आणि काहीसा विचित्र स्वभाव असलेला हा माणूस मनात खोलवर साठवलेल्या आघातांमुळे इतरांपासून दुरावलेला दिसत आहे. त्याचा अस्वस्थपणा आणि मनातील अढी कथेला गंभीर आणि विचारप्रवर्तक वळण देताना दिसते.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, “अनेकदा आपण मनाला गाठी मारून ठेवतो. आयुष्यात घडलेल्या काही घटना आपल्यावर खोलवर आघात करतात आणि त्याच अनुभवांना आपण संपूर्ण आयुष्य मानू लागतो. त्या अनुभवांवर प्रतिक्रिया देण्यात किंवा मनात अढी धरून ठेवण्यात आपला बराच काळ जातो. मात्र काळाच्या ओघात ही अढी सुटली, तरच आयुष्य प्रवाही होऊ शकतं. ही अढी नात्यांमधून, जिव्हाळ्यातून सुटते आणि त्यानंतर आयुष्य पुन्हा पुढे सरकायला लागतं. ‘माया’ हा चित्रपट याच भावनिक प्रवासावर भाष्य करणारा आहे.”
Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा नवीन राडा, कॅप्टन आयुषवर विशालचा चढला पारा !
शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन यांच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. टीझरमुळेच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी ही हळवी पण खोलवर जाणारी कथा प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करून राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






