(फोटो सौजन्य – Instagram)
परदेशी फिरायला जाण्याचं स्वप्न प्रत्येकजण कधी ना कधी बघत असतं. दुसऱ्या देशात जाऊन फिरावं असं तुम्हालाही नाक्कीचं वाटलं असेल मात्र यामध्ये आपलं बजेट एक मोठी समस्या बनून येतं. परदेशी पर्यटन करायचं म्हटलं तर आपल्याकडे एक चांगलं बजेट असणं फार गरजेचं आहे, दुसऱ्या देशात जाऊन राहणं, तिथलं खाणं-पान ट्रॅव्हल यात बराच खर्च होतो. बजेटमुळे परदेशी पर्यटनाचे अनेकांचे स्वप्न स्वप्नच बनून राहते मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका आयलँडविषयी माहिती सांगत आहोत जिथे तुम्ही कमी पैशात अनेक सोई-सुविधांचा आनंद लुटू शकता आणि तुमची ट्रिप संस्मरणीय बनवू शकता.
Vatican City: जगातील सर्वात लहान देश, काही तासांचाच प्रवास अन् कमी किमतीतच करता येईल विदेश यात्रा
आज तुम्हाला ज्या बेटाबद्दल सांगणार आहोत जिथे भारतीय लोकांसाठी केवळ व्हिसा फ्री नाही तर जेवण, पेय आणि राहण्याची व्यवस्था देखील खूप स्वस्त आहे. या बेटाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक मुलगी या बेटाला भेट देण्यासाठी गेली आहे आणि तिने त्याबद्दल जे काही सांगितले ते आश्चर्यकारक आहे. या बेटावर पेट्रोलची किंमत फक्त ४० रुपये प्रति लिटर आहे आणि दारू देखील स्वस्त आहे कारण ती ड्युटी फ्री आहे. याशिवाय हॉटेलचा खर्चही फार नाही. आता तुम्हालाही या ठिकाणाचे नाव जाणून घेण्याची इच्छा झाली असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हे बेट लँगकावी आहे, जे मलेशियामध्ये आहे.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलीचे नाव रूप वर्मा असे आहे, ती एक सोलो ट्रॅव्हलर आणि इन्फ्लुएंसर आहे. रूपने या ठिकाणाचा व्हिडिओ @roopvermaa या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रूपने लिहिले आहे की, तुम्हाला क्वालालंपूर ते लंगकावी थेट विमानसेवा मिळेल. भारतातून प्रवास आणि राहण्याचा खर्च अंदाजे २५ हजार रुपये आहे. या बेटावर तुम्हाला दोन ते पाच हजार रुपयांमध्ये दोन रात्रींसाठी हॉटेल सहज मिळू शकते. जेवणाचा खर्च देखील ६०० ते १००० रुपयांपर्यंत असेल. यासह इथे प्रत्येक ऍक्टिव्हिटीमागे तुम्हाला दोन हजार रुपयांचा खर्च येईल.
व्हिडिओमध्ये ती म्हणते की, हे बेट पूर्णपणे व्हिसा फ्री आहे आणि संपूर्ण बेट देखील ड्युटी फ्री आहे. अशा परिस्थितीत इथे दारू देखील खूप स्वस्तात मिळते. मद्यपान करणाऱ्यांना इथे खूप मजा येते. येथे भरपूर शाकाहारी पदार्थ देखील मिळतात, तेही फक्त २०० ते ३०० रुपयांना. इतकेच नाही तर या बेटावर पेट्रोल ४० रुपये प्रति लिटर आहे. तुम्ही येथे गाडी भाड्याने घेऊ शकता, टाकी भरू शकता आणि दिवसभर फिरू शकता. येथे सुंदर धबधबे आणि समुद्रकिनारे देखील आहेत, जे खूप स्वच्छ आहेत. गुहांपासून जंगलांपर्यंत सुंदर ठिकाणांचे सादरीकरण तुम्हाला इथे पाहायला मिळेल. याशिवाय, येथील वन्यजीवन देखील उत्तम आहे, इथे तुम्हाला अनेक ठिकाणी ,मॉनिटर सरडे पाहायला मिळतील, यासहच इथे इतर प्राणीही दिसून येतात. व्हिडिओ शेअर करणाऱ्या मुलीने सांगितले की हे बेट खरोखरंच एक सुंदर आणि परवडणारे ठिकाण आहे जिथे प्रचंड आनंद लुटता येईल.