फोटो सौजन्य - Social Media
आजच्या धावपळीत अनेकांना एकाच वेळी उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) आणि मधुमेह (डायबिटीज) या दोन्ही आजारांनी ग्रासले आहे. हे दोन्ही विकार जीवनशैलीतील चुकीच्या सवयींमुळे आणि असंतुलित आहारामुळे वाढतात. विशेष म्हणजे याचा फटका आता केवळ वयस्क लोकांनाच नाही, तर तरुणांनाही बसू लागला आहे. या दोन्ही समस्या एकत्र आल्यास हृदय, मूत्रपिंड आणि डोळ्यांवरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे औषधांसोबत योग्य आहार घेणं अत्यंत गरजेचं ठरतं.
हाय बीपी झाल्यास रक्तवाहिन्यांमध्ये ताण निर्माण होतो, आणि त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो. दुसरीकडे, मधुमेहामुळे शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे शरीरातील इतर अवयव हळूहळू प्रभावित होतात. हे दोन्ही आजार एकत्र असतील, तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या गुंतागुंतीच्या समस्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणूनच अशा वेळी आहारात कमी मिठाचा, कमी साखरेचा, अधिक फायबरयुक्त आणि चांगल्या प्रकारच्या चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करणे उपयुक्त ठरते.
आहारात ओट्स, रागी, बाजरी, ब्राऊन राइस आणि क्विनोआ यांसारख्या होल ग्रेन पदार्थांचा समावेश फायबरच्या दृष्टीने लाभदायक असतो. याशिवाय पालक, मेथी, पत्तागोभी, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्याही हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याच्या ठरतात. लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारी फळं जसे की सफरचंद, पपई, संत्री, बेरी यांचा आहारात समावेश करावा. अक्रोड, बदाम, अलसी बियाणं आणि एवोकाडो यांसारखे चांगल्या चरबीचे स्रोत हृदय आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
प्रोटीन मिळवण्यासाठी लो-फॅट दही, टोफू, अंड्याचा पांढरा भाग आणि डाळींचा उपयोग केला जाऊ शकतो. हे पदार्थ पचनास मदत करतात आणि भूकही नियंत्रणात ठेवतात. तसेच, जास्त मिठाचे सेवन टाळावे कारण ते रक्तदाब वाढवते. साखर आणि साखरयुक्त पदार्थ शुगर लेव्हल अचानक वाढवतात. डीप फ्राय पदार्थ, ट्रान्स फॅट्स, रेड मीट आणि प्रोसेस्ड फूड्समुळे हृदयावर विपरीत परिणाम होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, केवळ औषधांवर अवलंबून न राहता, आपल्या आहार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे ही काळाची गरज आहे. योग्य आहार हीच आजारांपासून बचावाची पहिली पायरी आहे.