थंडीत नियमित करा गाईच्या तुपाचे चमचाभर सेवन!
कोरड्या आणि निस्तेज झालेल्या त्वचेवर गाईचे तूप लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल. याशिवाय त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊन जातो आणि त्वचा खूप जास्त कोरडी आणि निस्तेज झाल्यासारखी वाटते. याशिवाय ओठ फुटणे, गाल कोरडे होणे किंवा हात-पाय फुटणे इत्यादी सर्वच समस्यांवर तूप प्रभावी ठरेल. चेहऱ्यावरील खाज कमी होऊन त्वचेचा लालसरपणा कमी करण्यासाठी तुपाचा वापर करावा. संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांनी कोणत्याही स्किन केअरचा वापर करण्याऐवजी तुपाचा वापर करावा. तुपामध्ये असलेले नैसगरिक घटक त्वचेवरील लाल रॅश कमी करतात.
तुपाचा वापर जेवणातील गोड, तिखट इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे तुम्ही तूप चपातीसोबत, नुसतेच किंवा सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सुद्धा खाऊ शकता. तुपामध्ये जीवनसत्त्व ए, इ, डी आणि के२ इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय तूप खाल्ल्यामुळे शरीरात कोलाजेनची निर्मिती होण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या ओमेगा–३ आणि ओमेगा–९ फॅटी ऍसिड युक्त घटकांमुळे त्वचा खूप जास्त उजळदार आणि सुंदर दिसते. प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून तुपाचे सेवन करण्यासोबतच तुपाचा वापर करून बनवलेली क्रीम सुद्धा वापरावी. यामुळे त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही.
गाईचे तूप आरोग्यासाठी अतिशय मौल्यवान आहे. उपाशी पोटी नियमित एक चमचा तूप खाल्ल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच आतड्यांचे कार्य सुधारते. आतड्यांचे आरोग्य कायमच निरोगी राहते. तुपाच्या सेवनामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या गाईच्या तुपाचा वापर शरीरासाठी करावा. मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी तुपाचे सेवन करण्याचा सल्ला जातो. गाईच्या तुपातील नैसर्गिक ओलावा शरीरासाठी फायदेशीर आहे.






