पॅकेज्ड फूड खाण्याने होणारे नुकसान
हल्ली कामाचा व्याप इतका वाढला आहे की, घरात जेवण करणे अशक्य होऊन बसलं आहे आणि त्याशिवाय बाहेर पॅकेज्ड फूडचे इतके पर्याय वाढले आहेत की ते खाण्यामध्येच भारतीय लोकांचा कल वाढला आहे. अशा परिस्थितीत पॅकेज्ड असणारे पदार्थ हवे असण्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. कोणालाही घरी हेल्दी जेवण बनविण्याइतका वेळच नाही. त्यामुळे असे पर्याय शोधले जातात.
भारतातील अलीकडील अहवालानुसार, 38% लोक त्यांची भूक भागवण्यासाठी पॅक केलेले, खारट आणि तेलकट स्नॅक्स सारखे अस्वास्थ्यकर पदार्थ खातात. अमेरिकेच्या इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटने (IFPRI) जारी केलेल्या ‘ग्लोबल फूड पॉलिसी रिपोर्ट 2024: हेल्दी डाएट अँड न्यूट्रिशन’मध्ये ही चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतो अहवाल
अहवालानुसार, मुख्यत: खराब खाण्याच्या सवयींमुळे भारतातील 16.6% लोकसंख्या कुपोषणाने ग्रस्त आहे. 10 पैकी 4 भारतीय अनहेल्दी पॅकेज्ड फूड, तर फक्त दोन व्यक्ती या 5 शिफारस केलेल्या अन्न गटांचे सेवन करत आहेत. यामध्ये स्टार्चयुक्त पदार्थ, भाज्या, फळे, कडधान्ये आणि काजू यांसारख्या सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा – अनहेल्दी सोडा, सकाळच्या नाश्त्यात एनर्जीने भरलेल्या ‘या’ पदार्थांचा समावेश करा
साखर, सोडियम आणि फॅट्स पदार्थ
पॅकेज्ड फूडमध्ये कोणते पदार्थ अधिक
पॅकबंद खाद्यपदार्थ आणि स्नॅक्समध्ये अनेकदा साखर, चरबी आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ अत्यंत चविष्ट असतात, परंतु शरीरासाठी हानिकारक असू शकतात. त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो आणि सध्या भारतामध्ये या कारणामुळेच विविध आजारांना बळी पडत असल्याचे दिसून येत आहे.
काय आहे तज्ज्ञांचे मत
पॅकेज्ड फूड खाणे हानिकारक का आहे
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पॅकेज्ड फूडमध्ये पोषक तत्वे कमी असतात, तर ताजी फळे, भाज्या आणि नैसर्गिक पदार्थ शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर देतात, जे निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक असतात. पॅकबंद स्नॅक्समुळे लोकांना लोह, जस्त आणि जीवनसत्त्वे यासारख्या सूक्ष्म पोषक घटकांची कमतरतादेखील होऊ शकते.
वेळ आणि चव वाचवण्यासाठी लोक आरोग्याशी तडजोड करत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आपल्या आहारात ताज्या आणि पौष्टिक गोष्टींचा योग्य वेळी समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपण या गंभीर आजारांपासून सुरक्षित राहू शकतो आणि निरोगी जीवन जगू शकतो.
हेदेखील वाचा – रोज हेल्दी समजून खाताय 5 पदार्थ वास्तविकता देईल धक्का, आरोग्याचे सर्वात मोठे शत्रू!
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.