फोटो सौजन्य - Social Media
घरामध्ये पाळीव प्राणी पाळण्याची अनेकांना आवड असते. कुणाला श्वान पाळण्यास आवडतात तर अनेकांना मांजरी पाळण्याची सवय असते. अनेकांना आपल्या पाळीव प्राण्याचे आपल्याला येऊन चाटणे आवडते. कारण त्यांना असे वाटते कि ते प्रेम व्यक्त करत आहेत. हो पाहायला गेले तर ते नक्कीच प्रेम व्यक्त करत आहेत. परंतु, हे प्रेम तुमच्या आरोग्यावरही बेतू शकते. याचे अनेक वाईट परिणाम असतात. त्यामुळे अशा गोष्टींचा लळा लावून घेण्यापेक्षा वेळीच धोका ओळख आणि स्वतःला होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवा. श्वानाच्या तसेच इतर पाळीव प्राण्याच्या जिभेवर विविध प्रकारचे बॅक्टरीया असण्याची शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊयात. जर तुम्हाला पाळीव प्राण्याच्या चाटण्यापासून काही इजा झाली किंवा समस्या उद्भवली तर काय करता येऊ शकते?
जर प्राण्याला रेबीजच्या संक्रमणाची लागण असेल तर अशा प्राण्याच्या आपल्याला चाटल्याने इतर आजार होण्याची शक्यता असते. जरी या आजाराची वॅक्सीन देशात उपलब्ध असली तरी हा आजार एक भयंकर आजार आहे आणि या पासून स्वतःचे सरंक्षण करणे गरजेचे आहे. तसेच श्वानाच्या लाळेमध्ये पाश्चुरेला मल्टीसिडा नावाचा जीवाणू असतो. हा मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतो. मुळात, या जीवाणूमुळे मेनिनजाइटिस नावाचा आजार होण्याची शक्यता असते.
स्टैफिलोकोकस नावाचा एक जीवाणू आहे. हा जीवाणू श्वानाच्या अंगावर वास करतो. हा जीवाणू जखमांना आणखीन गंभीर करतो. तसेच यामुळे श्वानाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. विचार करा कि जर हा जीवाणू चुकून मानवी जखमेवर आला कि त्याचे काय वाईट परिणाम होतील? त्यामुळे श्वानांच्या अगदी चाटण्यापासून जरा लांब राहावे. तसेच श्वानांच्या लाळेत आढळणारा सालमोनेला हा जीवाणू अत्यंत गंभीर असतो. हा जीवाणू फक्त लाळेतच नाही तर श्वानाच्या मलमूत्रांमध्येही आढळतो.
पाळीव श्वानांची काळजी घेताना काही गोष्टींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. आपल्या श्वानाला रोज आंघोळ घालण्याऐवजी गरजेनुसार आंघोळ घालावी. त्याच्या दातांची नियमितपणे स्वच्छता करणे गरजेचे आहे, ज्यामुळे त्याचे आरोग्य चांगले राहील. पाळीव प्राण्याला वेळेवर लसीकरण करणे ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर, श्वानाला चेहरा चाटू देऊ नये, कारण त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. श्वानासोबत खेळल्यानंतर हात धुणे आवश्यक आहे, ज्यामुळे स्वच्छता राखली जाऊ शकते आणि संसर्ग टाळता येतो.






