गणपती बाप्पा म्हटल्यावर आपण मोरया का म्हणतो? (फोटो सौजन्य: iStock)
गणेशोत्सव म्हंटलं की सर्वात जास्त जल्लोष हा महाराष्ट्रात पाहायला मिळतो. गणरायाच्या नामघोषात राज्यातील प्रत्येक शहरं दुमदुमून जातात. मंडळ असो की घर, सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाने आनंदाचे वातावरण निर्माण होते. गणपती बाप्पा हा चौसष्ट कलांचा अधिपती असण्यासोबतच विद्येचा सुद्धा देवता आहे. तसेच, कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी गणपतीला पुजले जाते. त्याचप्रमाणे कुठेही ट्रिपला जाताना किंवा एखाद्या महत्वाच्या कामाची सुरुवात करताना आपसूकच मुखातून ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष होत असतो. मात्र, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की गणपती बाप्पा म्हंटल्यानंतर मोरयाच का बोलले जाते? यामागील कथा तब्बल 600 वर्ष जुनी आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
Ganesh Chaturthi 2025 : भारतातच नाही तर या 4 देशांमध्येही मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव
पुणे शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर चिंचवड हे गाव आहे. या गावात जन्मलेले मोरया गोसावी हे गणरायाचे निस्सीम भक्त होते. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी ते चिंचवडहून जवळपास 95 किलोमीटर अंतरावर असलेल्या अष्टविनायकांपैकी एक मयुरेश्वर गणपती मंदिर, मोरगाव येथे दर्शनासाठी जात असत. पुढे त्यांनी याच पवित्र स्थळाला आपले स्थायी निवासस्थान केले. अखंड भक्तीभावाने त्यांनी 42 दिवस तप साधना करून गणरायाला प्रसन्न केले होते.
मोरया गोसावी यांची गणेशभक्ती सर्वत्र पसरली होती. असे म्हंटले जाते की वयाच्या तब्बल 117व्या वर्षापर्यंत ते नियमितपणे मयुरेश्वर गणपती मंदिरात जायचे. मात्र, वृद्धपणामुळे त्यांना त्यांचे शरीर मंदिरापर्यंत जाण्यास हवे तसे साथ देत नव्हते. आपल्याला गणरायाचे दर्शन घडत नाही या विचाराने मोरया गोसावी दुखी होते. अशातच, गणरायाच्या मोरया गोसावींच्या स्वप्नात येऊन त्यांना दर्शन दिले आणि म्हंटले,”उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन.”
दुसऱ्या दिवशी चिंचवड येथील कुंडात स्नानासाठी गेलेले मोरया गोसावी स्नानानंतर पूजा करत असताना त्यांना कऱ्हा नदीच्या पात्रा गणरायाची मूर्ती सापडली. गणरायाने स्वतः त्यांना दर्शन दिले होते. नंतर हीच मूर्ती मोरया गोसावी यांनी चिंचवडच्या मंदिरात स्थापित केली. काही वर्षांनी त्यांनी समाधी घेतली आणि त्यांची समाधीही याच मंदिराच्या परिसरात बांधण्यात आली. हे स्थान आज मोरया गोसावी मंदिर (Morya Gosavi Mandir) म्हणून प्रसिद्ध आहे.
मोरया गोसावींची गणरायावर इतकी श्रद्धा होती की त्यांचे नाव थेट गणरायाशी जोडले गेले. मग पुढे लोक फक्त ‘गणपती बाप्पा’ न म्हणता आपोआप ‘गणपती बाप्पा मोरया’ असे म्हणू लागले. पुण्यातील चिंचवड गावातून सुरू झालेला हा जयघोष आज देशभरात गणेशभक्तांच्या ओठांवर घुमताना ऐकू येतो.