(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतामध्ये गणेशोत्सव केवळ शहरातील उत्सव, पंडालांची रोषणाई किंवा भव्यतेपुरता मर्यादित नाही. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील घनदाट जंगलांमध्ये सुमारे ३००० फूट उंचीवर वसलेली ढोलकल गणेशाची प्राचीन प्रतिमा याचे उत्तम उदाहरण आहे. सुमारे हजार वर्षे जुने हे ठिकाण आजही इतिहास, लोककथा आणि भक्तिभाव यांचे अद्भुत मिश्रण म्हणून ओळखले जाते.
Ganesh Chaturthi 2025 : भारतातच नाही तर या 4 देशांमध्येही मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव
परशुराम व गणेशजीची कथा
दंतेवाडा जिल्ह्यातील ही मूर्ती ११व्या शतकात नागवंशी राजांनी उभारलेली मानली जाते. काळ्या ग्रॅनाइट दगडातून कोरलेली ही मूर्ती २.५ ते ३ फूट उंच व सुमारे ५०० किलो वजनाची आहे. ढोलकाच्या आकाराच्या दगडातून बनविल्यामुळे याला “ढोलकल” हे नाव पडले. स्थानिक आख्यायिकेनुसार, याच ठिकाणी परशुराम आणि गणेशजीचा सामना झाला. परशुरामांच्या फरशाच्या वाराने गणपतीचा एक सुळा (दात) तुटला, असे मानले जाते. जवळील फरसपाल गावाचे नावही याच कथेतून पडले आहे. आजही त्या गावात परशुरामाचे छोटे मंदिर पाहायला मिळते.
खुल्या आकाशाखालील अनोखी मूर्ती
ढोलकल गणेशाची खासियत म्हणजे येथे कुठलाही मंदिराचा मंडप किंवा छत नाही. उघड्या आकाशाखाली ही मूर्ती विराजमान आहे. पारंपरिक जनेऊच्या ऐवजी मूर्तीवर सर्पाची आकृती कोरलेली आहे, जी नागवंशीय प्रभावाचे प्रतीक मानली जाते.
जंगलातून जाणारा मार्ग
ढोलकलपर्यंत पोहोचण्यासाठी फरसपाल गावापासून साधारण ७ किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. हा मार्ग घनदाट जंगलातून जातो. वाटेत सुगंधी मोगऱ्याचे वेल, मोठमोठे मुंग्यांचे टेकाड, लहान झरे आणि भग्नावस्थेत असलेली प्राचीन सूर्य व देवीमातेची मंदिरे दिसतात. हा प्रवास स्वतःतच एक साहसी अनुभव देतो.
आदिवासी संस्कृतीशी नाते
ढोलकल गणेश केवळ धार्मिक स्थळ नसून बस्तरच्या आदिवासी समाजाच्या परंपरांचा भाग आहे. स्थानिक भोगामी जमात स्वतःला या ठिकाणाशी जोडते. जुन्या लोककथेनुसार, येथे एक स्त्री पुजारिणी शंख वाजवत असे, ज्याचा आवाज दूरवरच्या गावांपर्यंत ऐकू जात असे. दरवर्षी माघ महिन्यात येथे मोठा जत्रा उत्सव भरतो, ज्यात गावकरी आणि श्रद्धाळू मोठ्या संख्येने सहभागी होतात.
जर तुम्हाला गणेशोत्सव २०२५ मध्ये गर्दीपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि अध्यात्मिक अनुभव घ्यायचा असेल, तर बस्तरच्या जंगलातील ढोलकल गणेश मंदिर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
ढोलकल गणेश मंदिराला कसे पोहोचावे?
हवाई मार्ग : रायपूर आणि विशाखापट्टणम हे दोन सर्वात जवळचे मोठे विमानतळ आहेत. ते दंतेवाडापासून सुमारे ४०० किमी अंतरावर आहेत. जवळचे मिनी विमानतळ म्हणजे जगदलपूर, जे रायपूर व विशाखापट्टणमला जोडलेले आहे.
रेल्वे मार्ग : दंतेवाडा व विशाखापट्टणमदरम्यान दोन दैनिक गाड्या धावतात.
रस्ता मार्ग : रायपूर, हैदराबाद व विशाखापट्टणमहून दंतेवाडा येथे नियमित बस सेवा उपलब्ध आहे.
भेट देण्याचा योग्य काळ कोणता?
ढोलकल दर्शनासाठी हिवाळ्याचा काळ (डिसेंबर ते फेब्रुवारी) सर्वात उत्तम मानला जातो. या वेळी हवामान सुखद असते आणि पायवाटाही सुरक्षित असतात. पावसाळ्यात मात्र घसरडेपणामुळे धोका वाढतो.